

फोटो- NGP26I32914
लातूर ः मराठवाडा रेल कोच फॅक्टरीत तयार करण्यात येत असलेले वंदे भारत स्लीपरचे डबे.
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ३१ ः वंदे भारत स्लीपर कोचमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक डब्यात आठ आपत्कालीन सुरक्षा बटन बसविण्यात येणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना थेट रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधता यावा म्हणून ही सुविधा दिली जाणार आहे. ही आधुनिक सुविधा प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि चिंतामुक्त बनवणार आहे.
भारतीय रेल्वे आणि रशियाच्या संयुक्त सहकार्यातून स्थापन झालेली ‘किनेट रेल्वे सोल्यूशन्स’ या कंपनीकडून लातूरमधील मराठवाडा रेल कोच फॅक्टरीमध्ये वंदे भारत स्लीपर डब्यांची निर्मिती सुरू आहे. सध्या या कारखान्यात दोन ‘वंदे भारत स्लीपर’ प्रारूप ट्रेनसेटची जोडणी सुरू झाली आहे. कारखान्यात प्रवासी सुविधांचा विचार करून आधुनिक उपाययोजना करण्यात येत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वंदे भारत स्लीपर गाड्यांमध्ये देखील सेन्सरवर चालणारे स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येत आहेत. जुन्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये रेल्वेचे दरवाजे हाताने उघडावे किंवा बंद करावे लागतात. त्यामुळे अनेकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. नवीन वंदे भारत स्लिपर गाड्यांमध्ये सेन्सरवर चालणारी आणि स्वयंचलितरीत्या बंद-उघडी होणारी आधुनिक दारे बसविण्यात येत आहेत. वंदे भारत स्लिपर गाडी ताशी १६० किलोमीटर वेगाने धावू शकेल.
विशेष घटकांच्या सुविधांकडे लक्ष
या रेल्वेगाडीमध्ये सर्वसामान्य प्रवाशांसोबतच विशेष घटकांच्या सोयीसुविधांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी अनुकूल असणारी विशेष आसने आणि आधुनिक शौचालये या गाड्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या कमी हालचाल असलेल्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर होईल. तसेच प्रवासादरम्यान बाहेरचा त्रासदायक आवाज आत येऊ नये म्हणून प्रभावी ध्वनिरोधक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. गाड्यांच्या जोडणी भागामध्ये धूळ आणि माती रेल्वेच्या आत प्रवेश करू नये, यासाठी विशेष सीलबंद गँगवेची रचना करण्यात आली आहे.
कोट
कारखान्यात तयार होत असलेल्या वंदे भारत स्लिपर डब्यांच्या रचनेत प्रवासी सुविधा आणि सुरक्षेचा अधिकाधिक विचार करण्यात येत आहे. त्यामुळेच प्रत्येकी एका डब्यात आठ सुरक्षा बटन देण्यात येत आहेत. हे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे.
- के. सत्यामूर्ती,
व्यवस्थापकीय संचालक- किनेट रेल्वे सोल्युशन्स, लातूर
-----------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.