वारकरी संप्रदायाचा ‘ऑनलाइन’ अभ्यासक्रम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

पुणे - संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांनी पाया रचलेल्या वारकरी संप्रदायाने परंपरा जपून काळानुरूप बदल स्वीकारले आहेत. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात पंढरीची वारीही ‘हायटेक’ झाली. त्याचाच एक भाग म्हणून वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेण्यासाठी पंढरपूर, आळंदी, देहू या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाणे शक्‍य होत नाही. अशा साधकांसाठी पैठणच्या शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशनने पुढाकार घेतला आहे. या संस्थेच्या वतीने वारकरी संप्रदायाचा अभ्यासक्रम आता ऑनलाइन सुरू केला आहे. त्याला साधकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. 

श्री जोग महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वी आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना करून वारकरी संप्रदायाच्या अभ्यासक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. त्याचा लाभ हजारो विद्यार्थ्यांना झाला. संत तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी येथे आजही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येतात. आळंदी, पंढरपूर, देहू, पैठण येथे अनेक वारकरी संस्थांमध्ये काही प्रमाणात संतसाहित्याचे शिक्षण दिले जाते. मात्र, वेळ, स्थळ अथवा योग्य मार्गदर्शनाअभावी अनेकांना ते शक्‍य होत नाही. शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशनने वारकरी सांप्रदायिक संतांच्या वाङ्‌मयाचे अध्ययन उपलब्ध व्हावे, या साठी वारकरी संप्रदायाचा अभ्यासक्रम ऑनलाइन केला आहे. श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेला हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असणार आहे. 

ऑनलाइन अभ्यासक्रमाची गरज 
वारकरी संप्रदायाचा अभ्यास करण्याची अनेकांना इच्छा असते. मात्र, शिक्षण संस्थांची वेळ व स्थळ यांचे गणित जुळत नसल्याने अभ्यास करणे शक्‍य होत नाही. हीच उणीव लक्षात घेऊन संतसाहित्याचा अभ्यास करता यावा, यासाठी हा अभ्यासक्रम तयार केला आहे. आधुनिक युगात ऑनलाइन अभ्यासक्रमाची गरज होती. त्यानुसार नियोजन केले आहे, असे शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशनचे प्रमुख योगिराजमहाराज पैठणकर यांनी सांगितले.

संस्थेचा उद्देश
अभ्यासक्रमात संतजीवन आणि वाङ्‌मयाचा आढावा घेणार
संत वाङ्‌मय वैविध्यपूर्ण पद्धतीने सादर करणार 
शांती, समता, बंधुभाव, ज्ञान व भक्तीचा ओघ सर्वांपर्यंत पोचावा
संत वाङ्‌मयाविषयी श्रद्धा, प्रेम व जिज्ञासा असणे प्रवेशाची पात्रता असेल

असा घ्या प्रवेश
अभ्यासक्रमासाठी रजिस्ट्रेशन आवश्‍यक
प्रवेशशुल्क दोनशे रुपये 
रजिस्ट्रेशनसाठी संकेतस्थळ : http://santeknath.org/eknath/index.php

परीक्षेचे स्वरूप
फेब्रुवारी-मार्च, जून-जुलै व ऑक्‍टोबर-नोव्हेंबर या महिन्यांत होणार परीक्षा
प्रथम दोन परीक्षा अनुक्रमे तीस गुणांच्या, तर तिसरी परीक्षा चाळीस गुणांची असेल 
संतसाहित्य ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येईल
अभ्यासक्रमासाठी संदर्भ पुस्तकांची यादी देण्यात येईल 
अभ्यासक्रमात बदल करण्याचा अधिकार मिशनकडे राखीव
 अनुत्तीर्ण परीक्षार्थीस पुढील वर्षी पुन्हा त्याच परीक्षेस बसता येईल
- उत्तीर्ण होण्यासाठी किमान तीस टक्के गुणांची गरज जात, वय, लिंग व धर्माचे बंधन नाही
स्मार्ट मोबाईल किंवा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरूनही परीक्षा देऊ शकाल

Web Title: varkari sampraday online syllabus