पिंपोडे बुद्रुक पुलाचे काम रखडले

पिंपोडे बुद्रुक पुलाचे काम रखडले
Published on

वसना नदीवरील पुलाचे काम संथ

पर्यायी रस्ता नसल्याने नागरिकांची कसरत; अपघातांची संख्या वाढली

पिंपोडे बुद्रुक, ता. १० : वाघोली (ता. कोरेगाव) येथील वसना नदीवरील पुलाचे काम गेल्या दहा महिन्यांपासून रखडले असून, पर्यायी रस्त्याच्या अभावामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पुलाचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी कोणताही सुलभ पर्यायी मार्ग उपलब्ध करून न देता पूल पाडण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ब्रिटिशकालीन पुलाचे आयुर्मान संपल्याने तो पाडण्यात आला. मात्र, स्थानिक ग्रामपंचायतींशी सल्लामसलत न करता ठेकेदाराने पूल पाडल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. पूल पाडल्यानंतर प्रशासनाने वाहतूक सोनकेमार्गे वळवण्याची नोटीस काढली होती. मात्र, नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर नदीपात्रातून तात्पुरती पाऊलवाट तयार करण्यात आली. मात्र, तिच्या दोन्ही बाजूंना उंच सुळके असल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकांना दुखापत होऊन उपचारासाठी खर्च करावा लागला, तसेच काही वाहनांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. दरम्यान, पुलाच्या कामासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची चर्चा असली तरी प्रत्यक्ष काम मात्र संथ गतीने सुरू असल्याचे दिसत आहे.

पिंपोडे येथे पुलाच्या बिम्सचे काम संथ गतीने सुरू आहे. पुलाचे काम कधी पूर्ण होईल, याबाबतही स्पष्ट माहिती नागरिकांना मिळत नसल्याची तक्रार आहे. पूल पाडून जवळपास दहा महिने उलटूनही काम पूर्णत्वास गेलेले नाही. नुकताच नदीपात्रातील रस्ता उंचावण्यासाठी मोठा भराव टाकण्यात आला आहे. हा पर्याय आधी अवलंबला असता तर प्रवाशांना दुखापती झाल्या नसत्या, असा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. पुढील महिन्यात कोरेगावच्या उत्तर भागातील यात्रा-जत्रा तसेच लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. परीक्षा संपून शाळांना सुट्या लागणार असल्याने या मार्गावरून वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

चौकट
सोनके रस्त्याची चाळण
पर्यायी रस्ता न देता पूल पाडणे आणि त्यानंतर दीर्घकाळ काम ठप्प ठेवणे ही नागरिकांची फसवणूक आहे. वाघोली-सोनके रस्त्याची चाळण झाली असून, पिंपोडे बुद्रुक बाजारपेठेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. ग्राहकांची वर्दळ कमी झाली असून, संबंधित ठेकेदार व प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पुलाचे काम पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

01631
वाघोली ः वसना नदीवरील पुलाच्या बिम्सचे संथ गतीने सुरू असलेले काम. (राहुल लेंभे : सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com