कास - वासोटा किल्ल्यावर आता सुरक्षा रेलिंग....

कास - वासोटा किल्ल्यावर आता सुरक्षा रेलिंग....

Published on

वासोटा किल्ल्यावर आता सुरक्षा रेलिंग

पर्यटन होणार अधिक सुरक्षित; वन विभागाच्या साहाय्याने काम

कास, ता. ४ : राज्यभरातील ट्रेकर्ससह पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या वासोटा किल्ल्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेषत: खोल दऱ्यांच्या कडांवर लोखंडी रेलिंग बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. दोन तासांची पायपीट करत कामगारांकडून डोक्यावरून गडावर साहित्य पोहोचवले जात आहे. दरम्यान, कोयना खोऱ्यातील या व्याघ्रगडावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाच्या साहाय्याने हे काम करण्यात येत आहे.
कोयना धरणाच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज जलसागरातून बोटीने वासोट्याच्या पायथ्याला पोहोचता येते. त्यानंतर घनदाट अरण्यातून दोन तासांच्या पायपिटीनंतर गडावर जाता येते. सुटीच्या दिवशी साधारणत: तीन ते चार हजार पर्यटक किल्ल्याला भेट देत असतात. यावेळी किल्ल्यावरून दिसणारे निसर्गाचे रूप विलक्षण ठरते. उंचच उंच कडे अन् प्रचंड खोल दऱ्या मनात धडकी भरवतात. याचवेळी गडाच्या तिन्ही बाजूने असलेले धोकादायक कडे डोळ्यांचे पारणे फेडतात. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी रेलिंग बसवण्यात येत असून, यामुळे पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. विशेष म्हणजे मजबूत आणि पक्क्या रेलिंगमुळे गडाचे ऐतिहासिक सौंदर्य अबाधित राहण्यास मदत होणार आहे.
सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटनवाढीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे या परिसरात पर्यटनासाठी नवनवीन सुविधा उपलब्ध होत असून, याचा व्याघ्र प्रकल्प परिसरातील पर्यटनवाढीसाठी फायदा होणार आहे.

चौकट:
बोट ॲम्बुलन्सची गरज
वासोटा किल्ल्यावरील वाढती गर्दी लक्षात घेता आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यासाठी बोट ॲम्बुलन्सची सुविधा अत्यावश्यक आहे. सध्या ही सुविधा उपलब्ध नसल्याने गंभीरप्रसंगी जीवितहानीचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासनाने तातडीने बोट ॲम्बुलन्स सेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

कोट:
वासोटा किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक पर्यटक ग्रुप लीडरच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून रील्स किंवा फोटोसाठी धोकादायक कड्यांवर जातात, ज्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. व्याघ्र प्रकल्पाच्या या संवेदनशील परिसरात अपघात टाळण्यासाठी वन विभागाने हाती घेतलेला सुरक्षेचा उपक्रम स्वागतार्ह आहे.
- ओंकार ओक, सदस्य, राज्यस्तरीय साहसी पर्यटन समिती

फोटो ओळ:
04675
वासोटा : गडाच्या पायथ्यापासून घनदाट अरण्यातून दोन तासांची पायपीट करत डोक्यावरून गडावर लोखंडी साहित्य पोहोचवताना महिला भगिनी.

Marathi News Esakal
www.esakal.com