esakal | अश्विनी भिडे यांना ‘वत्सलाबाई जोशी’ पुरस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

ashiwini-bhide

भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या कलाकारांना दरवर्षी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात दिला जाणारा ‘वत्सलाबाई जोशी’ पुरस्कार या वर्षी जयपूर घराण्याच्या ख्यातनाम गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

अश्विनी भिडे यांना ‘वत्सलाबाई जोशी’ पुरस्कार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या कलाकारांना दरवर्षी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात दिला जाणारा ‘वत्सलाबाई जोशी’ पुरस्कार या वर्षी जयपूर घराण्याच्या ख्यातनाम गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये व मानपत्र असे आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग असलेला ‘षड्‌ज’ हा अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित लघुपट महोत्सव तसेच ‘अंतरंग’ हा ख्यातनाम कलाकारांबरोबर संवादाचा कार्यक्रम ११ ते १४ डिसेंबरदरम्यान आयोजित केला आहे. गणेशखिंड रस्त्यावर सवाई गंधर्व स्मारकामध्ये सकाळी १० ते १२ या वेळेत हा कार्यक्रम होईल. दोन्ही कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहेत, असे आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितले. रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार, राहुल शितोळे या वेळी उपस्थित होते.

या वर्षीच्या स्वर शताब्दी प्रदर्शनात उस्ताद अल्लारखाँ, पं. फिरोज दस्तूर, पं. रविशंकर आणि डॉ. वसंतराव देशपांडे या दिग्गज कलाकारांच्या प्रकाशचित्रांचा समावेश आहे. ‘षड्‌ज’अंतर्गत बुधवारी (ता. ११) दिग्दर्शक व्ही. पाकिरीसामी यांचा ‘पंडित रामनारायण : अ ट्रिस्ट विथ सारंगी’, त्यानंतर एस. एन. शास्त्री दिग्दर्शित ‘उस्ताद अमीर खाँ’ हे लघुपट दाखविण्यात येतील. ‘अंतरंग’मध्ये पहिल्या दिवशी अमरेंद्र धनेश्वर हे प्रसिद्ध बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांची मुलाखत घेतील. गुरुवारी (ता. १२) प्रमोद पाटी दिग्दर्शित ‘मोमेंट्‌स विथ द माइस्ट्रो’ (पंडित रविशंकर), यानंतर ‘म्युझिक ऑफ इंडिया’ (संतूर) आणि मधू बोस दिग्दर्शित ‘भरतनाट्यम’ (डान्सेस ऑफ इंडिया) हे माहितीपट दाखविले जातील. नंतर सरोदवादक केन झुकरमन यांची मुलाखत होईल. शुक्रवारी (ता. १३) उषा देशपांडे दिग्दर्शित ‘ख्याल’ हा लघुपट दाखविण्यात येईल. यानंतर उल्हास पवार हे गायक स्वामी कृपाकरानंद यांची मुलाखत घेतील. शनिवारी (ता. १४) ओडिसी नृत्यांगना रीला होता यांची मुलाखत कथक नृत्यांगना पूर्वा शहा घेतील.

रिक्षा पंचायतीचा विशेष सहभाग
महोत्सवात ‘रिक्षा पंचायत’ संघटनेचा उत्स्फूर्त सहभाग असेल, असे नितीन पवार यांनी सांगितले. महोत्सवाच्या ठिकाणी प्रवाशांसाठी रिक्षा उपलब्ध करून देणार आहेत. याशिवाय, महाराष्ट्रीय मंडळाच्या प्रांगणात महिला व ज्येष्ठ प्रवासी यांना मदत करण्यात येईल. ज्या रिक्षाचालकांना ११ ते १५ डिसेंबरदरम्यान या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी ९८५९१९८५९१ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

पीएमपीएमएल बससेवा
महोत्सवादरम्यान पीएमपीएमएल विशेष बससेवा देणार आहे. कार्यक्रम संपल्यानंतर कार्यक्रमस्थळापासून धायरी (मारुती मंदिर), कोथरूड डेपो, वारजे माळवाडी आणि निगडी (भक्ती-शक्ती चौक) या भागापर्यंत बसची व्यवस्था केली आहे.

loading image