

मातीच्या काळजातून उमटलेला काव्याविष्कार : ‘वावरात’
‘पोशिंदा’ या काव्यसंग्रहानंतर ‘वावरात’ या दुसऱ्या काव्यसंग्रहाच्या निमित्ताने कवी नंदकुमार शेडगे ग्रामीण कवितेचा समृद्ध, वास्तव व संवेदनशील अवकाश घेऊन वाचकांसमोर आले आहेत. शेतमातीशी असलेले घट्ट नाते, शेतकऱ्याचे कष्टमय जगणे, निसर्गाची साथ-आघात, ग्रामीण संस्कृती, गोतावळा, नाती आणि माणुसकी यांचे प्रत्ययकारी चित्रण हे या संग्रहाचे वैशिष्ट्य आहे. मातीच्या आत दडलेले आणि मातीच्या बाहेर पसरलेले सुख-दुःख कवीने शब्दांच्या माध्यमातून अलगदपणे उलगडले आहे.
“शेतामातीत राबणाऱ्या, कष्टकरी, शेतकरी मायबापांना आणि त्यांचा वारसा जपणाऱ्या शेतकरी लेकरांना...”
ही अर्पणपत्रिका ‘वावरात’ काव्यसंग्रहाच्या भावविश्वाची दिशा सांगते. या संग्रहात एकूण ८० कविता आहेत. नांगराच्या फाळाने काळी माती उघडावी, त्याप्रमाणे या कविता, ग्रामीण जीवनाचे अनेक पदर उलगडतात. शेतकरी कुटुंबात वाढलेल्या कवीने शेती आणि कष्टकरी जीवन केवळ पाहिलेले नाही, तर ते जगले आहे. त्यामुळे ‘वावरात’मधील कविता अनुभवाच्या मातीतून आलेल्या दिसतात. शेती हा केवळ कवितेचा विषय न राहता कवीच्या भावविश्वाचा मुख्यबिंदू बनतो. पिकांशी जुळलेले भावनिक नाते, निसर्गाची अनिश्चितता, अवकाळी पाऊस, कोरडा मिरग आणि डोळ्यांत साचणारे पाणी या सगळ्यांचे प्रतिबिंब कवितेत उमटते.
‘कुणब्याच्या’ कवितेतील
मिरग कोरडा
दुबार पेरणी
डोळ्यात पाणी....
या तीनच ओळी शेतकऱ्याच्या काळजातील वेदना अत्यंत प्रभावीपणे सांगतात. कोरडा मिरग, पुन्हा करावी लागणारी पेरणी आणि डोळ्यांत आलेले पाणी या तीन प्रतिमांमध्ये शेतकऱ्याच्या मोडलेल्या आशा आणि अस्वस्थ वर्तमान सामावले आहे. ‘आवकाळी’ या कवितेतील ‘पाण्यात बुडला संसार’ ही प्रतिमा अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी जीवनाची व्यथा थेट काळजाला भिडवते.
‘वावरात’मधील कविता केवळ दुःखाची कविता नाही, ती घामाला प्रतिष्ठा आणि मातीला देवत्व देणारी कविता आहे.
देव नाही पंढरीतला
माझ्या बापाने पाहिला
भिजलेल्या ढेकळात
त्याने पांडुरंग पाहिला
भिजलेल्या ढेकळात पांडुरंग पाहणारा शेतकरीबाप, ही या कवितेतील अत्यंत हृदयस्पर्शी प्रतिमा. ज्याच्या हाताला माती लागते, त्याच हाताला देव भेटतो, अशी ग्रामीण श्रद्धेची निर्मळ जाणीव या कवितेतून व्यक्त होते. या काव्यसंग्रहात शेतकरी स्त्रीचे कष्टमय जगणेही तितक्याच संवेदनशीलतेने आले आहे.
रानामध्ये उन्हामध्ये
माझी राबते माय
तिला बघून हंबरती
गोठ्यातील गाय
उन्हातान्हात राबणारी माय ही केवळ घरचा संसार सांभाळणारी स्त्री नाही, तर ती ग्रामीण जीवनातील कष्टकऱ्यांचे प्रतीक आहे. तिच्या कष्टात संसाराची धडपड आहे. तिच्याकडे पाहून गोठ्यातील गाय हंबरते, ही प्रतिमा तिच्या कष्टाला एक वेगळी उंची प्राप्त करून देते.
मराठी ग्रामीण कवितेत आलेला विठ्ठल केवळ आराध्य दैवत म्हणून आलेला नसून तो कष्टकऱ्यांची माउली आणि सुख-दुःखाचा वाटेकरी म्हणून येत राहतो. ‘वावरात’ काव्यसंग्रहामध्ये विठ्ठलाच्या अनुषंगाने आलेल्या अनेक कविता ग्रामीण श्रद्धाविश्वासाचे दर्शन घडवतात. बाप, पसा, शेतात, वसा, धनी या कवितांमधून वडिलांविषयी ऋणानुबंध आणि भावविश्व व्यक्त होते. तर माय, श्रम, आई, माती या कवितांमधून शेतकरी स्त्रीच्या कष्टाचे व तिच्या मायेचे चित्र उभे राहते.
बापाचा घाम, मायची माया, बैलाची सोबत, हिरवेगार शिवार, काळी माती, नातीगोती आणि विठ्ठलावरील अगाध श्रद्धा या सगळ्यांतून ग्रामीण जीवनाची एक हळवी, जिवंत, भावपूर्ण दुनिया साकारताना दिसते.
‘वावरात’ काव्यसंग्रहातील कवीची भाषा सहज, सोपी व ओघवती आहे. कविता वाचताना त्या लिहिलेल्या वाटत नाहीत, तर त्या जगलेल्या वाटतात. या काव्यसंग्रहातील कविता शेताच्या बांधावरून थेट वाचकाच्या मनाच्या बांधावर येऊन थांबतात. मायबापाच्या कष्टातून, पिकांच्या हिरवाईतून, विठ्ठलाच्या भक्तीतून आणि काळ्या मातीतून जन्मलेली ही कविता, ग्रामीण जीवनाचे अस्सल चित्र उभे करते. ‘वावरात’ हा केवळ कवितांचा संग्रह न राहता माती, माणूस, श्रम आणि निसर्ग यांच्यातील जिव्हाळ्याचा संवाद ठरतो. मातीत, घामात आणि शेतकऱ्याच्या जगण्यात विठ्ठल उभा आहे, असा आशय मुखपृष्ठातून प्रभावीपणे व्यक्त होतो. या काव्यसंग्रहाची प्रस्तावना डॉ. श्रीपाल सबनीस यांनी लिहिलेली आहे. त्यामुळे ‘वावरात’च्या भावविश्वाला वैचारिक, तसेच साहित्यिक संदर्भाची समृद्ध जोड लाभली आहे. वावरात हा काव्यसंग्रह वाचताना आपण केवळ कविता वाचत नाही, तर एका मातीच्या जगण्याला काळजातून अनुभवतो.
काव्यसंग्रह : वावरात
कवी : नंदकुमार शेडगे
प्रकाशक : समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर
पृष्ठे : ९६
प्रथम आवृत्ती : जुलै २०२६
मूल्य : १८०/-
- डॉ. संजयकुमार सरगडे
विहे, ता. पाटण
पुस्तकायन
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.