

अविनाश ढगे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३ : वाहनाचा विमा आणि प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) दीर्घकाळ नूतनीकरण केलेले नाही, अशा वाहनधारकांना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून (मॉर्थ) संदेश पाठवले जात आहेत. त्यात वाहन ‘परमनंट अर्काइव्ह’मध्ये (कायमस्वरुपी अभिलेखागार) टाकल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
राज्यातील अनेक वाहनधारकांना त्यांच्या वाहनांच्या नोंदणी क्रमांकासह मोबाईल क्रमांकावर मागील चार दिवसांपासून संदेश प्राप्त होत आहेत. यामध्ये आरटीओशी संपर्क साधण्याचा उल्लेख असल्याने वाहनधारक तेथे जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ‘‘या संदर्भात केंद्रीय मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत कार्यपद्धती किंवा मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेली नाही,’’ असा दावा प्रशासन करत आहे. तसेच, वाहनांची नोंदणी सक्रिय करण्याच्या प्रक्रियेबाबत अधिकाऱ्यांनाही स्पष्टता नसल्याचे समोर आले आहे.
वाहनमालकांना आलेला संदेश
‘‘विमा आणि पीयूसी प्रमाणपत्राचे दीर्घकाळ नूतनीकरण न केल्याने संबंधित वाहन ठराविक तारखेपासून ‘परमनंट अर्काइव्ह’मध्ये टाकण्यात येणार आहे. मोटार वाहन कायद्यानुसार नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनाचा वापर सुरू ठेवणे कायदेशीर गुन्हा आहे. अधिक कार्यपद्धतीसाठी आरटीओशी संपर्क साधावा.’’
वाहनचालकांचे प्रश्न
- विमा आणि पीयूसी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करता येणार का?
- वाहनाची नोंदणी पुन्हा सक्रीय करण्यासाठी प्रक्रिया काय?
-या प्रक्रियेसाठी दंड किंवा शुल्क भरावे लागणार का?
मोबाईलवर संदेश आल्यानंतर आरटीओ कार्यालयात गेलो. पण, वाहन पुन्हा सक्रिय करण्याबाबत अधिकृत कार्यपद्धती प्राप्त झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वाहनांची नोंदणी सक्रीय करण्यासाठी नक्की काय करायचे? कोठे जायचे? याची स्पष्टता हवी.
- रमेश साळवी, वाहनमालक
वाहन ‘परमनंट अर्काइव्ह’मध्ये टाकल्याचा संदेश अनेकांना आला आहे. याबाबतच्या कार्यपद्धतीसाठी आरटीओशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. मात्र, त्याबाबत अधिकृत कार्यपद्धती किंवा मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.
- राजेश नार्वेकर, परिवहन आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.