घरफोडी, चोरीप्रकरणातील सराईत गुन्हेगारास अटक

घरफोडी, चोरीप्रकरणातील सराईत गुन्हेगारास अटक
Published on

वेल्हे, ता. १६ : वेल्हे (ता.राजगड) पोलिसांनी घरफोडी व चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत सराईत चोरट्यास गुरुवारी (ता. १३) अटक केली. त्याच्याकडून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती शनिवारी (ता.१५) वेल्हे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किशोर शेवते यांनी दिली.
रमेश बबन मरगळे (वय २२, मूळ गाव शिरकोली. सध्या राहणारा वेल्हे (ता. राजगड) यास अटक केली असून
आरोपीस न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत (ता.१७) पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
वेल्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका फार्महाऊसच्या बांधकामासाठी आणलेले सुमारे ८८ हजार रुपयांचे साहित्य ९ ऑगस्ट रोजी चोरीला गेले होते. याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
तपासादरम्यान पोलिसांना संशयित चोरटे पुन्हा चोरीच्या उद्देशाने गावात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने गस्त वाढविली. संशयास्पदरीत्या फिरणारा पिकअप टेम्पो पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबविता पळ काढला. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने टेम्पो अडविला. यावेळी दोघे जण पळून गेले; मात्र चालक रमेश बबन मरगळे याला ताब्यात घेण्यात आले.
मरगळे याला न्यायालयासमोर हजर केले असता पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली. या कारवाईत प्रभारी अधिकारी किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमित देशमुख, पोलीस हवालदार गजानन खत्री, गोपनीय विभागाचे आकाश पाटील, सोमेश राऊत, युवराज सोमवंशी, बुद्धिवान मोरे, अजिंक्य बंडगर, आकाश पाटील, मयूर जगताप, शुभम कदम व सोमनाथ जाधव यांच्या पथकाने सहभाग घेतला.

Marathi News Esakal
www.esakal.com