

क्षणार्धात होत्याचे नव्हते...
डोळ्यांसमोर कोसळली घरे़; रात्रभर नागरिक रस्त्यांवर
कॅराकस, २५ जून (पीटीआय) : व्हेनेझुएलामध्ये झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपांमुळे अवघ्या काही सेकंदांत शेकडो कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले. नागरिकांच्या डोळ्यांसमोर त्यांची हक्काची घरे आणि टोलेजंग इमारती पत्त्यांसारख्या कोसळल्या. या आकस्मिक आपत्तीमुळे संपूर्ण देशात भीती आणि चिंतेचे सावट पसरले असून, हजारो नागरिकांनी आपली संपूर्ण रात्र रस्त्यावर जागून काढली. बेपत्ता मित्र आणि नातेवाइकांच्या काळजीत गुरुवारी नागरिक धावाधाव करताना दिसले.
आपली घरे उद्ध्वस्त होताना पाहणाऱ्या कॅराकसचे रहिवासी रॉबर्टो डमास यांनी आपला अनुभव सांगितला. ‘‘भूकंपाची शक्ती इतकी प्रचंड होती की इमारत अक्षरशः एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला हादरत होती. ते संपूर्ण चित्र मनाचा थरकाप उडवणारे होते. जमीन हलत होती आणि आम्हाला धड चालताही येत नव्हते. आमच्या अपार्टमेंटमधील सर्व काही उद्ध्वस्त झाले; पण सुदैवाने आम्ही जीव वाचवून बाहेर पडू शकलो,’’ असे ते म्हणाले.
‘बीबीसी’च्या लेखिका निकोल कोल्स्टर यांनीही या संकटाचा थरार अनुभवला. भूकंपाचे धक्के बसले तेव्हा त्या मध्य कॅराकसमधील पालोस ग्रांडेस येथील एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर होत्या. ‘‘खिडक्या अत्यंत वेगाने हलू लागल्या होत्या. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी समोरच्या दाराच्या चौकटीत किंवा दगडी भिंतीचा आडोसा घेण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. केवळ नशीब बलवत्तर म्हणून मी आज सुखरूप आहे,’’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
संकटाची तीव्रता
-कॅराकसजवळील मायकेतिया येथील ‘सायमन बोलिव्हार’ आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रचंड नुकसान झाल्याने ते वाहतुकीसाठी तातडीने बंद करण्यात आले आहे.
-राजधानी कॅराकसव्यतिरिक्त मिरांडा, ला ग्वायरा, अरागुआ, कॅराबोबो आणि फाल्कन या राज्यांना या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
-संपूर्ण बाधित भागातील रेल्वे आणि मेट्रोसेवा पूर्णपणे ठप्प झाली असून, मदतकार्यात अडथळे येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.