वेताळनगरमध्ये २२४ सदनिका वाटप होणार (व्हिडिओ)

दीपेश सुराणा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

पिंपरी - ‘जेएनएनयूआरएम-बीएसयूपी’ योजनेअंतर्गत उभारलेल्या वेताळनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील शिल्लक राहिलेल्या दोन इमारतींतील २२४ सदनिकांच्या वाटपासाठी येत्या मंगळवारी (ता. १८) चिंचवड येथील झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाच्या कार्यालयात संगणकीय सोडत निघणार आहे. सोडतीनंतर सदनिकाधारकांसमवेत तातडीने करारनामा करून नवीन वर्षात म्हणजे एक जानेवारीपर्यंत त्यांना घराचा ताबा देण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे.

पिंपरी - ‘जेएनएनयूआरएम-बीएसयूपी’ योजनेअंतर्गत उभारलेल्या वेताळनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील शिल्लक राहिलेल्या दोन इमारतींतील २२४ सदनिकांच्या वाटपासाठी येत्या मंगळवारी (ता. १८) चिंचवड येथील झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाच्या कार्यालयात संगणकीय सोडत निघणार आहे. सोडतीनंतर सदनिकाधारकांसमवेत तातडीने करारनामा करून नवीन वर्षात म्हणजे एक जानेवारीपर्यंत त्यांना घराचा ताबा देण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे.

वेताळनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात बारा इमारती उभारण्याचे नियोजन होते. मात्र, केंद्राच्या जेएनएनयूआरएम योजनेतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प सीमित झाल्याने या प्रकल्पात नऊ इमारतींचेच बांधकाम पूर्ण करण्यात आले. या प्रकल्पात १४४० सदनिका बांधण्यात येणार होत्या. तथापि, प्रकल्प सीमित झाल्याने त्यामध्ये १००८ सदनिकांचेच बांधकाम करण्यात आले. आतापर्यंत या प्रकल्पातील ७८४ सदनिकांचे वाटप झाले आहे. २२४ सदनिकांचे आता नव्याने सोडत काढून वाटप होणार आहे.   

प्रकल्पातील ए-७ इमारतीचे बांधकाम १० एप्रिल २०१७ ला पूर्ण झाले. मात्र, येथील रहिवाशांची ए-२ इमारतीला पसंती होती. त्यामुळे संबंधित इमारतीतील सदनिकांचे वाटप होऊ शकले नाही. दरम्यान, ए-२ इमारतीचे बांधकाम २९ जूनला पूर्ण झाले. सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरदेखील संबंधित इमारतीतील सदनिकांचे वाटप झाले नव्हते. दरम्यान, आता त्याला मुहूर्त सापडला आहे.

सदनिका वाटपाबाबतचा निर्णय महापालिका प्रशासनाने दीड वर्षापूर्वीच घ्यायला हवा होता. प्रशासनाच्या दिरंगाईने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ११२ लाभार्थ्यांनी स्वहिस्सा रक्कम भरली होती. तरीही इमारत देण्यास विलंब करण्यात आला. प्रकल्प सीमित केल्याने शिल्लक राहणाऱ्या झोपडीवासीयांच्या पुनर्वसनाबाबतदेखील निर्णय व्हायला हवा.
- मोमीन हजरत, नागरिक.

वेताळनगर झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत महापालिका प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. झोपडीवासीयांना आता त्वरित घरे मिळायला हवीत. त्यामध्ये प्रशासनाने विलंब करायला नको.
- अरुणा बनसोडे, नागरिक.

वेताळनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील ए-२ या इमारतीला सर्वाधिक पसंती होती. त्यामुळे ए-२ आणि ए-७ या इमारतीची सोडत काढून त्याबाबत तोडगा काढला आहे. आता सदनिकांच्या वाटपाबाबतचा निर्णय १८ तारखेला सोडत काढून घेतला जाईल. सदनिकाधारकांसमवेत करारनामा करून त्यांना एक जानेवारीपर्यंत नवीन घराचा ताबा देण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे.
- चंद्रकांत इंदलकर, सहायक आयुक्त 

वेताळनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प दृष्टिक्षेप
 प्रकल्पात मंजूर सदनिका :     १४४०
 प्रत्यक्ष बांधलेल्या सदनिका :     १००८
 निविदा रक्कम :     ५७.८५ कोटी
 कामासाठी आदेश :     १४ डिसेंबर २००७
 काम पूर्ण :     २९ जून २०१८  

Web Title: Vetalnagar Home Distribution