ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

veteran social worker Vidya Baal Passed away

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ (वय 84) यांचे आज (गुरुवार) सकाळी खासगी रुग्णालयात निधन झाले. स्त्रियांच्या पुरुषांबरोबरच्या समान हक्कांविषयीच्या सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ (वय 84) यांचे आज (गुरुवार) सकाळी खासगी रुग्णालयात निधन झाले. स्त्रियांच्या पुरुषांबरोबरच्या समान हक्कांविषयीच्या सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. 

विद्या बाळ यांचे पार्थिव आज दुपारी 2 ते 5 या वेळेत त्यांच्या प्रभात रोड येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी 1958 मध्ये बी.ए. (अर्थशास्त्र) ही पदवी घेतली होती. पुणे आकाशवाणीवर कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून विद्या बाळ यांनी दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर 1964 ते 1983 या काळात 'स्त्री' मासिकाच्या त्या साहाय्यक-संपादक झाल्या आणि 1983 ते 86 या काळात मुख्य संपादक होत्या. तेथून बाहेर पडल्यावर त्यांनी ऑगस्ट 1989 मध्ये 'मिळून साऱ्याजणी' हे मासिक सुरू केले.. या मासिकाच्या त्या संस्थापक-संपादक होत्या. मासिकात पहिल्या 20 वर्षांत प्रकाशित झालेल्या निवडक 45 लेखांच्या संग्रहाचे ’स्त्रीमिती’ नावाचे पुस्तक 2012 साली प्रसिद्ध झाले. विद्या बाळ यांच्या ’नारी समता मंच’ या संघटनेने गावोगावी जाऊन वाहत्या रस्त्यांवर ‘मी एक मंजुश्री’ नावाचं प्रदर्शन भरवले होतं. या प्रदर्शनाने अख्खा महाराष्ट्रच ढवळून निघाला होता.