वेंकय्या नायडू यांनी सांगितला 'थोडा खट्टा...थोडा मिठा...' प्रवास

मिलिंद संगई
शुक्रवार, 22 जून 2018

बारामती भेटीनंतर विद्या प्रतिष्ठानमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी दोन्ही भूमिकांबद्दल सांगत दोन्ही भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असल्याचे नमूद केले. 

बारामती शहर - खासदार ते उपराष्ट्रपती हा तुमचा प्रवास कसा होता, या प्रश्नावर उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी पहिली प्रतिक्रीया 'थोडा खट्टा...थोडा मिठा...' या शब्दात दिली. बारामती भेटीनंतर विद्या प्रतिष्ठानमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी दोन्ही भूमिकांबद्दल सांगत दोन्ही भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असल्याचे नमूद केले. 

एका पक्षाचा प्रमुख, खासदार अशा प्रवासानंतर एक घटनात्मक पद भूषविण्याचा हा अनुभव वेगळा होता. खासदार असताना मनमोकळे बोलता येत होते, आता मात्र घटनात्मक पद असल्याने अनेक बंधने आल्याचे उपराष्ट्रपतींनी मोकळेपणाने मान्य केले. अर्थात ही जबाबदारी वेगळी आणि एक वेगळा सन्मान यामुळे मिळाला असे ते म्हणाले. 

खासदार व पक्षप्रमुख हा एक वेगळा अनुभव होता आणि उपराष्ट्रपती हा एक वेगळा अनुभव आहे, या पदावर तुम्ही कमी बोलायचे व अधिकाधिक लोकांना समजून घ्यायचे असे काम आहे. मीही त्यानुसार जबाबदारी स्विकारल्यानंतर देशभरात फिरुन लोकांना व इतर बाबींना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. विविध शैक्षणिक, संशोधन या सारख्या संस्थांना भेटी देऊन त्यांच्या कामकाजाचीही माहिती घेत आहे. 

नायडू प्रभावशाली संसदपटू- पवार..
एक प्रभावशाली संसदपटू म्हणून मी नायडू यांना लोकसभेत पाहिले आहे, मी सत्ताधारी पक्षात होतो आणि ते विरोधी पक्षात होते तेव्हा ते कायम आक्रमक असायचे, पण आता ते सभापतीपदाच्या खुर्चीवरुन जेव्हा संसदेचे कामकाज चालवतात, तेव्हा त्यांचा अनुभव आणि खासदारांना शांत करण्याचे त्यांचे कौशल्य आम्ही जवळून पाहतो आहोत असे शरद पवार यांनी या वेळी सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vice President Venkaiah Naidu interacted with reporters after baramati meet