बदलत्या राजकारणाची बदलती समीकरणे 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

गुरुवारी (ता. 24) लागणाऱ्या निकालाचा अंदाज आणि बदललेल्या राजकारणामुळे बदललेली समीकरणे लक्षात येतात. 

विधानसभा 2019 

पिंपरी -  विधानसभा मतदारसंघ पुनर्रचना 2008 मध्ये झाली. हवेली व मुळशी मतदारसंघांचे विभाजन करून पिंपरी, चिंचवड व भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आले, आणि शहरातील राजकारण बदलू लागले. विधानसभा, लोकसभाच तसेच महापालिकेतही सत्तांतर झाले. राष्ट्रवादीची सत्ता जाऊन भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. विधानसभा स्तरावर हा बदल कसा होत गेला, तेथील राजकारण कसे राहिले, याचा आढावा घेतल्यास गुरुवारी (ता. 24) लागणाऱ्या निकालाचा अंदाज आणि बदललेल्या राजकारणामुळे बदललेली समीकरणे लक्षात येतात. 

पिंपरी 
शिवसेना गड राखणार? 
पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. या वेळी येथून सर्वाधिक 18 उमेदवार रिंगणात होते. यात आजी-माजी आमदारांचा समावेश आहे. 
- 2009 : मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर प्रथम आमदार होण्याचा मान राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळाला. त्यांचे अण्णा बनसोडे विजयी झाले. त्यांच्या विरोधात भाजपचे अमर साबळे आणि रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) चंद्रकांता सोनकांबळे होत्या. 
- 2014 : निवडणूक जाहीर झाल्यानंतर कॉंग्रेसचे गौतम चाबुकस्वार शिवसेनेत आले. निवडणूक लढविली आणि विजयी झाले. राष्ट्रवादीकडून मतदारसंघ निसटला. त्यांचे उमेदवार बनसोडे दुसऱ्या स्थानावर होते. भाजपने पुरस्कृत केलेल्या आरपीआयच्या चंद्रकांत सोनकांबळे तृतीय स्थानावर होत्या. 
- 2019 : चाबुकस्वार यांना शिवसेनेने पुन्हा उमेदवारी दिली आहे. महायुती असल्याने भाजप त्यांच्या सोबत आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी गेल्या वेळचेच अण्णा बनसोडे आहेत. त्यांना राष्ट्रवादीने ऐनवेळी उमेदवारी दिली आहे. शिवसेनेला भाजपची कितपत साथ मिळते त्यावर निकाल अवलंबून आहे. 

चिंचवड 
जगतापांची हॅटट्रिक होणार? 

लक्ष्मण जगताप चिंचवड विधानसभा मतदारसंघात सलग दहा वर्षे आमदार आहेत. या वेळी त्यांची हॅटट्रिक होणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. 
- 2009 : विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेत 2008 मध्ये चिंचवड मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यानंतर 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत लक्ष्मण जगताप आमदार झाले. त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. शेतकरी कामगार पक्षाचा त्यांना पाठिंबा होता. शिवसेनेचे श्रीरंग बारणे व कॉंग्रेसचे भाऊसाहेब भोईर प्रतिस्पर्धी होते. 
- 2014 : जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व विजयी झाले. त्यांनी एक लाख 23 हजार 786 मते मिळवली होती. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे राहुल कलाटे होते. तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विठ्ठल काटे होते. 
- 2019 : भाजप-शिवसेनेची महायुती आहे. भाजपचे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत जगताप यांनी ही निवडणूक लढविली. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे बंडखोर व गेल्या वेळचे प्रतिस्पर्धी कलाटे आहेत. त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुरस्कृत केले आहे. 2009 चे प्रतिस्पर्धी बारणे शिवसेनेचे खासदार असून त्यांची जगतापांना साथ आहे. भोईर मात्र, राष्ट्रवादीत आहेत. 

भोसरी 
अपक्ष परंपरा खंडित होणार? 

मतदारसंघ अस्तित्वात येऊन दहा वर्षे झाली. या कालावधीत दोन विधानसभा निवडणूक झाल्या. त्यात अपक्षांनीच बाजी मारली. पहिल्यांदा विलास लांडे व नंतर महेश लांडगे आमदार झाले. आता दोघेही प्रतिस्पर्धी आहेत. 
- 2009 : मतदारसंघाचे प्रथम आमदार होण्याचा मान विलास लांडे यांना मिळाला. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या सुलभा उबाळे व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंगला कदम होत्या. केवळ 1200 मतांनी लांडे विजयी झाले होते. 
- 2014 : लांडे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे महेश लांडगे यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढविली व विजयी झाले. लांडे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. दुसऱ्या स्थानावर शिवसेनेच्या उबाळे राहिल्या. भाजपचे एकनाथ पवार चौथ्या क्रमांकावर होते. लांडगे यांना 60 हजार 173 मते मिळाली होती. 
- 2019 : चार वर्षांपूर्वी लांडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी ते भाजपचे उमेदवार आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी लांडे आहेत. त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली. त्यांना ऐनवेळी राष्ट्रवादीने पुरस्कृत केले. मात्र, 2014 मध्ये चौथ्या क्रमांकावर असलेले पवार आता लांडगे यांच्यासोबत आहेत. शिवाय मतदारसंघातील 43 पैकी 34 नगरसेवक लांडगे यांचे समर्थक आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidha Sabha 2019 changing political equations