Vidhan Sabha 2019 : कसबा मतदारसंघाला बंडखोरीचे ग्रहण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 October 2019

उमेदवारी डावलली गेल्याने काँग्रेस आणि मनसेतील इच्छुकांनी, तर युतीत शिवसेनेच्या वाट्याला मतदारसंघ न मिळाल्याने पक्षाच्या नगरसेवकाने जाहीर केलेली उमेदवारी, यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघाला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे.

विधानसभा 2019  
पुणे - उमेदवारी डावलली गेल्याने काँग्रेस आणि मनसेतील इच्छुकांनी, तर युतीत शिवसेनेच्या वाट्याला मतदारसंघ न मिळाल्याने पक्षाच्या नगरसेवकाने जाहीर केलेली उमेदवारी, यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघाला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे.

युतीच्या उमेदवार महापौर मुक्ता टिळक, आघाडीचे उमेदवार अरविंद शिंदे, मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे या पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह नगरसेवक रवींद्र धंगेकर, माजी नगरसेविका रूपाली पाटील, शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकीत रंगत भरली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचे गेली पंचवीस वर्षे गिरीश बापट यांनी नेतृत्व केले. मात्र, बापट यांना लोकसभेची  संधी मिळाली. त्यामुळे पुन्हा एकदा कसबा आपल्याकडे खेचण्याची संधी विरोधी पक्षांना वाटू लागली.

कसब्यात बापट यांचा उत्तराधिकारी कोण असणार, हादेखील औत्सुक्‍याचा विषय झाला होता. पक्षाकडून महापौर मुक्ता टिळक यांना संधी देण्यात आली. आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला. काँग्रेसकडून महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे आणि रवींद्र धंगेकर  यांच्यामध्ये उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेर उमेदवारीची माळ गळ्यात पाडून घेण्यात शिंदे यांना यश आले. त्यामुळे टिळक विरुद्ध शिंदे अशी लढत दिसत असली, तरी या दोन्ही उमेदवारांना बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे.

भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनीदेखील या मतदारसंघातून अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर, उमेदवारी डावलली गेल्यामुळे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी कसबा विकास आघाडी स्थापन करून त्या माध्यमातून लढविण्याचा चंग बांधला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक मिलिंद काची यांनी वंचित आघाडीकडून उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अजय शिंदे रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे माजी नगरसेविका आणि मनसे महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली पाटील यांनी बंडखोरीचा पवित्रा घेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, कसब्यातील निवडणुकीत रंग भरला आहे. ही बंडखोरी कोणाच्या पथ्यावर पडणार, त्यातून कसब्यात बदल घडणार की हा गड आपल्याकडे राखण्यात भाजपला यश येणार, हा औत्सुक्‍याचा विषय झाला आहे.

कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर कसबा विकास आघाडी स्थापन करून त्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारी (ता. ४) मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
- रवींद्र धंगेकर, नगरसेवक

मी राजसाहेबांना भेटले. त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. दोन दिवसांत पक्षहिताचा निर्णय ते घेतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे मी उद्या (गुरुवारी) उमेदवारी अर्ज भरून ठेवणार आहे.
- रूपाली पाटील, अध्यक्ष,  मनसे महिला आघाडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Rebellion in Kasba Assembly constituency