Vidhan Sabha 2019 इंदापूर, बारामतीला दोन-दोन आमदार

ज्ञानेश्वर रायते
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

राज्यातील निकाल काहीही लागोत आणि सत्ता कोणाचाही येवो, इंदापूर व बारामती या पाच वर्षांसाठी नशीबवान ठरले आहेत, कारण राज्यात केवळ याच दोन मतदारसंघांना दोन-दोन आमदार मिळाले आहेत.

भवानीनगर (पुणे) : राज्यातील निकाल काहीही लागोत आणि सत्ता कोणाचाही येवो, इंदापूर व बारामती या पाच वर्षांसाठी नशीबवान ठरले आहेत, कारण राज्यात केवळ याच दोन मतदारसंघांना दोन-दोन आमदार मिळाले आहेत.

राजकारणात मागील पाच वर्षांपर्यंत इंदापूर व बारामतीत राजकारणाचा सवतासुभा दिसायचा. मागील पाच वर्षांत राष्ट्रवादीने बाजी मारत दत्तात्रेय भरणे यांच्या रूपाने हा सवतासुभा मिटवला. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना एकीकडे बारामतीच्या दोन सुपुत्रांनी बाजी मारली असतानाच, शेजारी इंदापूरलाही दुहेरी लाभ मिळाला. बारामतीत अजित पवार यांच्या फक्त विजयाची औपचारिकता होती, तर कर्जत-जामखेडच्या अत्यंत अवघड अशा मतदारसंघातून रोहित पवार यांची कसोटी लागली होती. तिथे पहिल्या फेरीपासूनच रोहित पवार यांनी निर्णायक आघाडी घेतली आणि बारामतीकरांना दोन आमदार मिळाल्याचा आनंद झाला. तसेही यापूर्वी बारामतीला तीन खासदार मिळालेले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, भाजपकडून अमर साबळे हे राज्यसभेचे, तर सुप्रिया सुळे या लोकसभेच्या खासदार आहेत. त्यामुळे बारामतीसाठी तीन खासदार व दोन आमदार असा पंचक बोनस आज मिळाला.

इंदापूरसाठी मात्र आजचा दिवस सोनियाचाच ठरला. इंदापूरमध्ये भरणे की पाटील यांच्यात चुरस सुरू असतानाच मोहोळ मतदारसंघातून इंदापूर तालुक्‍यातील शेळगाव येथील सुपुत्र यशवंत माने यांनी आघाडी घेतली होती. इंदापूर बाजार समितीचे उपसभापती यशवंत माने यांनी मोहोळ तालुक्‍यातून घेतलेली आघाडी इंदापूरकरांसाठी आशेचा किरण ठरली. अगदी अचानक उमेदवारी जाहीर करूनही यशवंत माने यांनी मोहोळमध्ये राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचारात अल्पावधीत निर्णायक आघाडी घेतली होती. त्याचे परिणाम निकालातही दिसून आले. त्यामुळे इंदापूरला दोन आमदार मिळाल्याचा आनंद आज इंदापूरकरांच्या चेहऱ्यावर होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha Election 2019