Vidhan Sabha 2019 शिरूर-हवेलीतील "ते' बडे नेते गारद

Pudhari
Pudhari

शिरूर (पुणे) : आपल्या राजकीय उलटापालटीने कायमच राजकारणात धांदल उडविणारे, "मला समाजसेवेचा छंद' म्हणत राजकीय विरोधकांना आपल्या परगण्यात कठोर प्रतिबंध करणारे, राजकारणापेक्षा इतर "उद्योग'धंद्यात मोठे झालेले, "नेता नव्हे; कार्यकर्ता' म्हणत जिल्ह्याच्या विविध भागांत नेतेगिरी करू पाहणारे अन्‌ "कोण येतंय आम्हाला आडवे,' असा पवित्रा घेणारे शिरूर-हवेलीच्या राजकारणातील अनेक दमदार नेते विधानसभा निवडणुकीत नवनिर्वाचित आमदार अशोक पवार यांच्या संयम आणि हुशारीच्या ताकदीसमोर गारद झाले आहेत.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल, आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र जासूद, भाजप कामगार आघाडीचे सरचिटणीस संदीप भोंडवे, जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे यांच्याकडे शिरूर-हवेलीच्या राजकारणात "बडे नेते' म्हणूनच पाहिले जाते. राजकारणातील त्यांची थेट भिडण्याची शैली, राजकीय व्यासपीठावरील आक्रमकपणा, वेळप्रसंगीचा धाकदपटशा, कार्यकर्त्यांवरील त्यांचा प्रभाव हा या मतदारसंघाला चांगलाच परिचयाचा आहे. थेट मोठ्या नेत्यांशी पंगा घेण्यासही यातील कुणीही मागेपुढे पाहत नाही, हा राजकीय इतिहास आहे. शिरूर-हवेलीतील भाजपचे उमेदवार बाबूराव पाचर्णे यांच्या प्रचारात यापैकी अनेक जण उघड सहभागी झाले; तर काहींनी "आतून' यंत्रणा लावली, काहींनी आपले समर्थक कार्यकर्ते, नातेवाईक भाजपात पाठविले. काहींनी भविष्यातील पदप्रतिष्ठेच्या व आर्थिक मलईच्या "बेगमी'साठी पाचर्णेंना दिखाऊ समर्थन दिले. पाचर्णेंच्या घोडदळाला यातील काहींनी भरीव "रसद' पुरविल्याचीही खमंग चर्चा आहे.

"अशोकबापू आमदार झाल्यास आपल्या राजकारणाचे काही खरे नाही, आपले राजकीय भवितव्य संपेल,' या भयाने पछाडलेल्या या "बड्या नेत्यांनी'ही त्यांना पाडण्यासाठी जीवतोड मेहनत केली. त्यासाठी प्रसंगी साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर करून पाहिला. पवारांच्या विरोधात डांगोरा पिटून वातावरण पेटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचे हे कारनामे कुठेच फळाला आले नाहीत. या "बड्या नेत्यांची' खेळी यशस्वी होऊ शकली नसल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून आले. बाबूराव पाचर्णे हे तालुक्‍यात शांत, मनमिळाऊ व संयमी नेते म्हणून ओळखले जातात. विधानसभेच्या गेल्या सहा निवडणुकांच्या आखाड्यात असल्याने समाजाच्या तळागाळातील घटकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध सर्वश्रुत आहेत. एक सरळमार्गी "आपला माणूस' म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली आहे.

बड्या नेत्यांना सणसणीत चपराक
निवडणूक काळात बाबूराव पाचर्णे या "भल्या माणसा'च्या व्यासपीठावर या "बाहुबलीं'ची वर्दळ सामान्यांना काहीशी खटकली आणि अशोक पवारांना पसंती देताना या सामान्य जनताजनार्दनाने या बड्या नेत्यांना सणसणीत चपराक दिली. त्यांच्या काळ्या काचांच्या आलिशान गाड्या, उंची कपडे, गळ्यातील सोन्याचे गोफ, भारी गॉगल, महागडे बूट हा पेहराव सामान्यांना रुचला नाही. बॉडीगार्डच्या गराड्यातून सभास्थळी होणारी त्यांची "एंट्री' आणि गर्दीतील आगमनावेळी त्यांच्या समर्थकांकडून सामान्यांना होणारी धक्काबुक्की आणि त्यातून होणारा अपमान व पर्यायाने येणारा राग सामान्य मतदारांनी "ईव्हीएम'च्या बटनातून व्यक्त केल्याचेही समोर येत आहे. वाळूवाले, जमीन खरेदी-विक्रीतील एजंट, बांधकाम व्यवसायातील बिल्डर, एमआयडीसीतील ठेकेदार, व्यावसायिक यांची पाचर्णे यांच्या प्रचारातील लुडबूडही सामान्यांना खटकली, जी त्यांनी "ईव्हीएम'द्वारे व्यक्त केल्याचे समोर येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com