Vidhan Sabha 2019 : शतप्रतिशत ‘काँटे की टक्कर’!

संभाजी पाटील 
Sunday, 6 October 2019

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना-रिपब्लिकन पक्ष या युतीच्या घटकपक्षांची नाराजी आणि तुल्यबळ उमेदवार यांमुळे शहरात विधानसभेसाठी ‘काँटे की टक्कर’ होणार, हे नक्की...!

विधानसभा 2019 

लोकसभा निवडणुकीत शहरातील विधानसभेच्या आठही जागांवर भाजपला घवघवीत यश मिळाले. मात्र, त्यामुळे विधानसभेची निवडणूक भाजपला तेवढीच सोपी जाईल, असे समजण्याचे काही कारण नाही. निवडणुका जेवढ्या स्थानिक पातळीवर लढविल्या जातात; तेवढे गटा-तटाचे राजकारण, नाराजी आणि व्यक्तिगत हितसंबंध यांसारख्या प्रत्येक राजकीय पैलूला महत्त्व प्राप्त होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना-रिपब्लिकन पक्ष या युतीच्या घटकपक्षांची नाराजी आणि तुल्यबळ उमेदवार यांमुळे शहरात विधानसभेसाठी ‘काँटे की टक्कर’ होणार, हे नक्की...!

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अनपेक्षित उमेदवारीमुळे पुणे आणि त्यातही कोथरूड मतदारसंघ राज्यभरात चर्चेला आला. आमदार मेधा कुलकर्णी यांची नाराजी आणि अस्वस्थता संपूर्ण राज्याने पाहिली. कसब्यात काँग्रेसमध्ये उठलेले वादळ अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पेल्यातच शमले. सोमवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आणखी बंडोबा थंड झालेले दिसतील आणि विजयादशमीच्या मुर्हूतावर पुण्यात प्रचाराची राळ उठेल. पक्षांतरामुळे या वेळची विधानसभा निवडणूक सुरवातीपासून चर्चेत राहिली आहे. पक्षांतराचा इफेक्‍ट पुण्यात दिसला नाही. पण, मरगळलेल्या विरोधी पक्षांनी आळस झटकला, हे गेल्या दोन-तीन दिवसांच्या घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुण्यात सुरवातीला भाजपला एकतर्फी वाटणारी निवडणूक आता मात्र मन लावूनच लढवावी लागणार, हे प्रत्येक मतदारसंघातील उमेदवार पाहिल्यानंतर स्पष्ट  होते.

भाजपला सर्वांत ‘सेफ’ मतदारसंघ म्हणून चंद्रकांत पाटील यांनी तो स्थानिकांची नाराजी ओढवून स्वतःकडे घेतला. या मतदारसंघासाठी ना काँग्रेसकडे ना राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार होता. किमान विरोधकांनी येथे एक शहाणपणाचा निर्णय घेतला; तो म्हणजे मनसेचे किशोर शिंदे यांना पाठिंबा देऊन पाटील यांना थेट लढत देण्याचा. या मतदारसंघात भाजपची ताकद आहे, यात वादच नाही. पण, विरोधकांची एकी पाहता विजय मिळविणे भाजपसाठीदेखील वाटते तेवढे सोपे नाही.

कसब्यात खासदार गिरीश बापट मागील पाच टर्म प्रतिनिधित्व करीत होते. ते उभे नसतानाची ही पहिली निवडणूक होत आहे. त्यामुळे विरोधकांना बळ आले आहे. काँग्रेस पूर्ण आत्मविश्‍वासाने या मतदारसंघात उतरल्याने स्वतः बापट यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागणार आहे. पर्वतीमध्ये लोकसभेत भाजपला चांगले मताधिक्‍य मिळाले होते. या मतदारसंघात आमदार माधुरी मिसाळ आणि नगरसेविका अश्‍विनी कदम यांच्यातील लढत उत्कंठावर्धक असेल. भाजपने शिवाजीनगर मतदारसंघात भाकरी फिरवली आणि सिद्धार्थ शिरोळे या तरुण चेहऱ्याला संधी दिली. या मतदारसंघात काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांना चांगलेच कष्ट घ्यावे लागणार आहेत. 

पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघ अंतर्गत नाराजीमुळे भाजपला सोपा नसेल. वंचित आघाडी, एमआयएस आणि इतर पक्ष कोणाची मते खाणार, हे निकालासाठी महत्त्वाचे ठरेल. वडगाव शेरीत गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचा मतदारसंघ पुन्हा एकदा मिळविण्यासाठी एकसंध राहून मेहनत करावी लागेल. 

शहरी मतदारांच्या ताब्यात असणाऱ्या खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीला प्रथमच सचिन दोडके यांच्या उमेदवारीने आव्हान उभे करता आले आहे. ते भाजपची मजबूत तटबंदी कसे फोडतात, यावर निकालाचे चित्र अवलंबून राहील. हडपसरला या वेळीदेखील मतविभागणी हाच महत्त्वाचा घटक राहील. आमदार योगेश टिळेकर, नगरसेवक चेतन तुपे आणि मनसेचे नगरसेवक वसंत मोरे या प्रत्येकाचे मतदारांचे हक्काचे ‘पॉकेट’ आहे. त्याचा विस्तार करण्यात कोण यशस्वी होणार, हे विजयासाठी महत्त्वाचे ठरेल.

पुरापासून वाहतूक कोंडीपर्यंत...
प्रचारात तुंबणाऱ्या पाण्यापासून अतिक्रमणांपर्यंत आणि वाहून गेलेल्या संसारापासून तासन्‌तास वाहतूक कोंडीचा सामना कराव्या लागणाऱ्या सर्वसामान्यांच्या विविध प्रश्‍नांपर्यंत अनेक विषय येतील. त्याचा यशस्वी सामना कोण करणार, यावरच दिवाळीत फटाके वाजविण्याची संधी कोणाला द्यायची, हे पुणेकर ठरविणार, हे नक्की.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha elections are not easy for the BJP in pune