स्थायी समितीसमोर १५७ कोटींचे विषय

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 September 2019

रस्ते, आरक्षणांचा विकास
भोसरी विधानसभा मतदारसंघातील चऱ्होली, डुडुळगाव, मोशी, चिखली, तळवडे, त्रिवेणीनगर, बोऱ्हाडेवाडी येथील नियोजित रस्ते व आरक्षणांचा विकास केला जाणार आहे. चऱ्होली-डुडुळगावमध्ये विद्युतकामे, चऱ्होली रस्ता विकसित करणे, भोसरी गावठाण, चिखली, मोशी, प्राधिकरणातील रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. चिंचवडमधील वाकड, पिंपळे निलख, रहाटणी, तापकीरनगर, श्रीनगर, चिंचवडेनगर, लक्ष्मणनगर, गणेशनगर आणि पिंपरीतील मोरवाडी, प्राधिकरण, कापसेचाळ, गणेशनगर आदी भागांतील रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे.

पिंपरी - विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्याच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता. ४) होणाऱ्या महापालिका स्थायी समिती सभेसमोर तब्बल १५७ कोटींचे विषय मंजुरीसाठी ठेवले आहेत. यात समाविष्ट गावांतील कामांना प्राधान्य दिला आहे. तसेच, सर्वाधिक १२२ कोटी रुपयांच्या खर्चाचे विषय शहरातील सर्वसमावेशक महत्त्वाचे आहेत. 

शहरातील प्रलंबित विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील दोन दिवसांपूर्वी महापालिकेत आले होते. अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. अधिकाऱ्यांनी प्रस्तावित व प्रलंबित विकास कामांचे सादरीकरण त्यांच्यासमोर केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले होते की, ‘‘येत्या दहा-बारा दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. त्या पार्श्‍वभूमीवर प्रलंबित विषय मार्गी लावा.

प्रकल्प अथवा विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटनांसाठी माझी किंवा अन्य कोणी मंत्र्यांची वाट पाहू नका. ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ही कामे करा.’’ त्यानंतरची पहिली स्थायी समिती सभा बुधवारी होत आहे. आचारसंहिता लागू झाल्यास आगामी दोन महिन्यांत कोणतेही निर्णय घेता येणार नाहीत. त्यामुळे बुधवारच्या सभेसमोर तब्बल १०८ विषय मंजुरीसाठी ठेवले आहेत. त्यात आणखी ऐनवेळच्या विषयांची भर पडू शकते. 

सर्वसमावेशक विषय
आकुर्डीतील खंडोबा माळ ते म्हाळसाकांत चौक पालखी मार्गाचे डांबरीकरण, पूरग्रस्त नागरिकांना चादर, ब्लॅंकेट्‌स व अन्य वस्तूंचे वाटप, नाशिक फाटा ते वाकड आणि सांगवी ते किवळे बीआरटी मार्गांसाठी ऑटोमॅटिक डोअर सिस्टिम बसविणे. आकुर्डीतील नाट्यगृहाचे उर्वरित कामे करण्यासाठी २४ कोटी, आंद्रा व भामा-आसखेड धरण पाणीपुरवठा योजनेसाठी जलशुद्धीकरण केंद्राचे संकल्पचित्र व अन्य कामे करणे, देखभाल दुरुस्ती आदी कामांसाठी ८० कोटी, चिंचवड येथील मंगलमूर्ती वाडा, चापेकर शिल्पसमूह व मोरया गोसावी मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी नऊ कोटी आदी कामांचा यात समावेश आहे. कुशल कामगार नसल्याने निगडी जलशुद्धीकरण केंद्र व रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रावर कंत्राटी पद्धतीने कुशल कर्मचारी नियुक्त करण्याचा विषयही मंजुरीसाठी आहे.

खर्च (रुपयांत)
भोसरी २३ कोटी
चिंचवड ६ कोटी
पिंपरी ६ कोटी
सर्वसमावेशक १२२ कोटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election Standing Committee Subject Municipal