शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
विदीप जाधव अनंतात विलीन
तरडगावमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; अनेकांना अश्रू अनावर
तरडगाव, ता. २९ : बारामती येथील दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक आणि तरडगावचे सुपुत्र विदीप दिलीप जाधव (वय ३७) यांना वीरमरण आले. काल (बुधवार) रात्री उशिरा तरडगाव पालखी तळ परिसरात शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अवघ्या पंचक्रोशीचे डोळे पाणावले होते.
विदीप जाधव हे २००९ मध्ये मुंबई पोलिस दलात भरती झाले होते. २०१० पासून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा पथकात स्थान मिळवले. सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्या. जे. ए. सानप यांचे सुरक्षा रक्षक, त्यानंतर २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा सांभाळली, तर २०१९ पासून ते अजित पवार यांचे सावलीसारखे अंगरक्षक म्हणून कार्यरत होते. कर्तव्य बजावत असतानाच काल नियतीने त्यांच्यावर घाला घातला. विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासमवेत विदीप जाधव व इतर तिघांचा मृत्यू झाला.
‘मी आज दादांसोबत बारामतीला येतोय, संध्याकाळी घरी मुक्कामाला येईन...’ असे सांगणारे विदीप तिरंग्यात लपेटून परतल्याचे पाहून त्यांच्या वृद्ध माता-पित्यांनी आणि पत्नीने केलेला आक्रोश उपस्थितांची काळीज चिरणारा होता. त्यांच्या मागे आई वडील, दोन बहिणी, तीन भाऊ, पत्नी संध्या व १३ वर्षांची मुलगी नेत्रा जाधव आणि आठ वर्षांचा मुलगा अद्विक जाधव ही दोन मुले असा परिवार आहे.
काल सायंकाळी विदीप यांचे पार्थिव गावात येताच संपूर्ण तरडगाव शोकसागरात बुडाले. सजवलेल्या ट्रॉलीतून त्यांची अंत्ययात्रा निघाली, जिथे अबालवृद्धांनी आपल्या लाडक्या सुपुत्राचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. पालखी तळ परिसरात पोलिस प्रशासनाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. बंदुकीच्या फैरी झाडून दिलेली सलामी आणि ‘विदीप जाधव अमर रहे’च्या घोषणांनी आसमंत हेलावून गेला. यावेळी आमदार सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, माजी सभापती वसंत गायकवाड, अभिजित पवार, तहसीलदार पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
-------------------
फोटो आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

