'विक्रम' सापडले पुढे काय? (व्हिडिओ)

सम्राट कदम 
रविवार, 8 सप्टेंबर 2019

'चांद्रयान-2'चे लँडर 'विक्रम' सापडल्याचे इस्रोचे अध्यक्ष के. सीवन यांनी सांगितले. थर्मल इमेजिंग छायाचित्राने त्याचा शोध लागला, असे जरी असले तरी त्यासोबत अजून कोणताही संपर्क प्रस्थापित झालेला नाही.

पुणे : "चांद्रयान-2'चे लँडर 'विक्रम' सापडल्याचे इस्रोचे अध्यक्ष के. सीवन यांनी सांगितले. थर्मल इमेजिंग छायाचित्राने त्याचा शोध लागला, असे जरी असले तरी त्यासोबत अजून कोणताही संपर्क प्रस्थापित झालेला नाही.

चंद्राभोवती फिरणाऱ्या "ऑर्बायटर'वर काही उपकरणे लादण्यात आली आहे. त्यामध्ये एक्‍स-रे स्पेक्‍ट्रोमिटर, सोलर एक्‍स-रे मॉनिटर, इन्फ्रारेड स्पेक्‍ट्रोमिटर, मॅपिंग कॅमेरा अशा उपकरणांचा समावेश आहे. यातील इन्फ्रारेड स्पेक्‍ट्रोमीटरने "विक्रम'मधून बाहेर पडणाऱ्या अवरक्त किरणांचा फोटो घेतला आहे. त्यालाच "थर्मल इमेजिंग' असे म्हणतात. त्याच्या अध्ययनानंतर इस्त्रोप्रमुखांनी ही पुष्टी केली आहे. 

- 'विक्रम'शी संपर्क करण्यासाठी फक्त 13 दिवसांचा कालावधी 

चंद्रावर 14 दिवस उजेड आणि 14 दिवस रात्र असते. दिवसा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 120 डिग्री सेल्सिअस तापमान असते आणि रात्री तेच तापमान उणे (निगेटिव्ह) 232 डिग्री सेल्सिअस असते. त्यामुळे दिवसा असलेल्या तापमानातच यंत्रे काम करू शकतात. रात्रीच्या तापमानात चंद्रयानाची यंत्रे काम करू शकत नाही. विक्रम चंद्रावर बेपत्ता होऊन पृथ्वीवरील एक दिवस संपला आहे. त्यामुळे हातात फक्त तेरा दिवस इस्त्रोकडे शिल्लक आहेत. 

- जर लँडर विक्रमशी संपर्क झाला तर "दोन' शक्‍यता 

1) जर विक्रम बारा डिग्रीपेक्षा कमी कोणात उतरले असेल तर त्यामध्ये असलेले "प्रग्यान' रोव्हर बाहेर काढणे शक्‍य आहे. प्रग्यान जर चंद्राच्या पृष्ठावर उतरले तर चांद्रयान-2 शंभर टक्के यशस्वी झाले असे म्हणता येईल. त्याद्वारे पुढील प्रयोग चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर करता येतील आणि नवी माहिती मानवाच्या हाती लागेल. 

2) जरी विक्रम कललेल्या अवस्थेत असेल तर त्यावर लादलेल्या उच्च दर्जाचे कॅमेरे, वातावरणाचा अभ्यास करणारी उपकरणे, चंद्रावरील भूकंपाचा अभ्यास करणारे सिस्मोमिटर, लेझरमिरर यांच्या मदतीने काही निरीक्षणे नोंदवता येतील आणि त्यातूनही मोठ्या प्रमाणावर वैज्ञानिक माहिती हाती लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vikram Found Now more what is After that