Chandrakant Patil : विक्रम गोखले यांचा अभिनयाचा वारसा अध्यासनाव्दारे जतन करु

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखा आणि आम्ही कोथरुडकर यांच्या संयुक्त विद्यमाने आज अंतरनाद योग केंद्र येथे विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित सभेत पालकमंत्री पाटील बोलत होते.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSakal
Summary

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखा आणि आम्ही कोथरुडकर यांच्या संयुक्त विद्यमाने आज अंतरनाद योग केंद्र येथे विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित सभेत पालकमंत्री पाटील बोलत होते.

कोथरूड - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विक्रम गोखले यांच्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टीने अध्यासन सुरु करुन त्यांच्या अभिनयाच्या वारसाचे जतन केले जाईल, असे आश्वासन महाराष्ट्राचे तंत्र आणि उच्चशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखा आणि आम्ही कोथरुडकर यांच्या संयुक्त विद्यमाने आज अंतरनाद योग केंद्र येथे विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत पालकमंत्री पाटील बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, विक्रम गोखले हे अभिनय क्षेत्रातील एक वडिलधारे आणि आदर्श व्यक्तिमत्व होते. त्यांची सामाजिक आणि राजकीय मते ही अतिशय परखड आणि स्पष्ट होती. ती मते ते वेळोवेळी निर्धास्त पद्धतीने मांडायचे आणि त्या मतांकरता ते आग्रही देखील असायचे. कलाकार म्हणून ते श्रेष्ठ होतेच त्या सोबतच त्यांनी त्यांची सामाजिक बांधिलकीही निभावली. पणजी, आजी आणि वडीलांच्या माध्यमातून तीन पिढ्यांचा अभिनयाचा वारसा लाभला असूनही त्यांनी त्याचा टेंभा मिरवला नाही.

विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले म्हणाल्या की, विक्रम गोखले नावाचा आॅरा ते कधी मिरवत नसत. घरी देखील सर्वसामान्य व्यक्तीसारखाच त्याचा सहज वावर असायचा. पीठलं-भाकरी आणि खर्डा त्याला खूप आवडायचा. अभिनयरुपी विद्या इतरांना वाटत राहण्यावर त्याचा प्रचंड भर होता.

या श्रद्धांजली सभेत संदिप खर्डेकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, गायक त्यागराज खाडीलकर, पुना गेस्ट हाऊसेचे किशोर सरपोतदार, राजेश दामले, निवेदक मिलिंद कुलकर्णी, विजय फळणीकर, नाट्य समिक्षक राज काझी, ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे आदींनी गोखले यांच्याविषयींच्या आठवणींना उजाळा दिला.

माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आणि अ‍ॅड.अर्चिता मंदार जोशी यांनी आयोजीत केलेल्या या श्रद्धांजली सभेत सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचलन अ‍ॅड.मंदार जोशी यांनी केले, तर अ‍ॅड. अर्चिता जोशी यांनी आभार मानले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गोखले यांच्या गेल्या तीन पिढ्यांना मिळलेल्या पारितोषिकांचे दालन निर्माण करण्यासाठी ज्या ट्रॅफीज गोखले यांच्या कुटूंबियांनी सुपूर्द केल्या आहेत ते दालन लवकरात लवकर उभे राहण्यासाठी पाटील यांनी त्यांच्या निधीतून तातडीने एक कोटी रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थांसाठी विक्रम गोखले यांनी पुस्तकरुपी जो खजीना सुपूर्द केला आहे त्याचे संवर्धन जतन करुन तो वारसा अभिनयाच्या क्षेत्रात पुढे येऊ पाहणाऱ्या कलाकारांपर्यंत हस्तांतरीत होण्याच्या दृष्टीकोनातून तांत्रिक बाजू तपासून पाहण्यात येतील.

भविष्यातही विक्रम गोखले यांच्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टीने अजून काही प्रस्ताव आल्यास बजेट मध्ये तो विषय मांडून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल, असे पाटील यांनी यावेळी सागितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com