

ग्राम रोजगार सहायकांची दिवाळी होणार गोड!
सोलापूर जिल्हा परिषदेकडून ४ कोटी ९८ लाखांचे मानधन वर्ग
सकाळ वृत्तसेवा
दक्षिण सोलापूर, ता. ३१ : ग्रामपंचायत विभागात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्राम रोजगार सहायकांच्या प्रतिमहा निश्चित मानधनाच्या मागणीला अखेर यश आले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील ग्राम रोजगार सहायकांचे एकूण चार कोटी ९८ लाख ७२ हजार रुपयांचे मानधन वर्ग करण्यात आले आहे. यामुळे रोजगार सहायकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, यंदाची दिवाळी त्यांच्यासाठी आनंदाची ठरणार असल्याची माहिती ग्राम रोजगार सहायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हाळाप्पा गावडे (गावडेवाडी, दक्षिण सोलापूर) यांनी दिली.
गावपातळीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) विविध कामांसाठी मजुरांची नोंदणी करणे, कामांचे नियोजन करणे आणि इतर प्रशासकीय जबाबदाऱ्या ग्राम रोजगार सहायक पार पाडतात. कामाचा वाढता व्याप आणि जबाबदाऱ्या लक्षात घेता, गेल्या अनेक दिवसांपासून मानधन वाढविण्याची मागणी केली जात होती. या मागणीसाठी रोजगार सहायकांनी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला.
या मागणीसाठी ठाण्याचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी शासनाकडे विशेष पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रतिमहिना आठ हजार रुपये निश्चित मानधन आणि दोन टक्के प्रोत्साहन भत्ता देण्याच्या मागणीला अखेर मंजुरी मिळाली. या लढ्यात नगरसेवक नवीन गवळी आणि राज्याध्यक्ष संदीप माने यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे जिल्हाध्यक्ष म्हाळाप्पा गावडे यांनी सांगितले. दीर्घकाळाच्या संघर्षानंतर मानधनाची रक्कम खात्यावर वर्ग झाल्याने जिल्ह्यातील ग्राम रोजगार सहायकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.