विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न

विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न

Published on

UPR26B07336, UPR26B07337
पंढरपूर : वसंत पंचमीनिमित्त गुरुवारी येथील विठ्ठल मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, राजेंद्र शेळके, माधवी निगडे, संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर आदी. (दुसऱ्या छायाचित्रात) अक्षता टाकताना भाविक.
---
विठ्ठल-रुक्मिणीचा शाही विवाह मोठ्या थाटामाटात
सनई-चौघड्यांच्या मंगल निनादात हजारो भाविक अक्षता सोहळ्यास उपस्थित
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. २३ : सनई- चौघड्यांचे मंगल स्वर... फुलांच्या माळांनी सजलेला मंडप आणि विवाह घटिकेची आतुरतेने वाट पाहणारी वऱ्हाडी मंडळी... साक्षात श्रीकृष्णस्वरूप विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा आज (शुक्रवारी) पंढरपुरात मोठ्या थाटामाटात व भक्तिमय वातावरणात पार पडला.
वसंत पंचमीच्या पावन दिनी मंदिर समितीच्या वतीने दरवर्षी परंपरेने साजरा होणारा हा आगळावेगळा आध्यात्मिक विवाह सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. रुक्मिणी स्वयंवर कथेनुसार वसंत पंचमीच्या दिवशी साक्षात भगवंताचा विवाह झाल्याची आख्यायिका असून, त्याच श्रद्धेने आज विठ्ठल- रुक्मिणीचा विवाह सोहळा विधिवत पार पडला.
दुपारी बारा वाजता मंदिरातील मुख्य सभामंडपात श्री विठ्ठल व रुक्मिणीच्या उत्सवमूर्तींना नवरा-नवरीप्रमाणे सोन्याचे अलंकार व भरजरी पोशाख परिधान करून सजविण्यात आले होते. सव्वा बाराच्या शुभमुहूर्तावर देव-ब्राह्मणांच्या साक्षीने सात मंगलाष्टका म्हणत तांदूळ व फुलांचा वर्षाव करून विवाह लावण्यात आला.
या सोहळ्यानिमित्त पुणे येथील भाविक भारत भुजबळ यांनी मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट केली होती. विवाहानंतर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते देवाची पूजा करण्यात आली. यावेळी भागवताचार्य अनुराधा शेटे यांनी रुक्मिणी स्वयंवर कथेवर आधारित भक्तिगीते सादर केली. ‘या पंढरपुरात बाई वाजत गाजत...’ या पारंपरिक लोकगीतावर हजारो महिला भाविकांनी ठेका धरत आपल्या भक्तीचा आनंद व्यक्त केला.
विवाह सोहळ्यापूर्वी सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सदस्य अॅड. माधवी निगडे, संभाजी शिंदे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून देवाच्या अंगावर गुलाल उधळण्यात आला.
---
चौकट
वऱ्हाडींना पंचपक्वान्नाचा महाप्रसाद
सर्वसामान्यांचा विवाह पाहण्याची सवय असलेल्या भाविकांसाठी साक्षात विठ्ठल- रुक्मिणीचा विवाह ‘याची देही याची डोळा’ अनुभवणे ही अविस्मरणीय अनुभूती ठरली. विवाहानंतर आलेल्या वऱ्हाडी भाविकांना पुरी-भाजी, भजी, गुलाबजाम, कोशिंबीर, जिलेबी, बालूशाही अशा पंचपक्वान्नाचा महाप्रसाद देण्यात आला. रात्री देवाच्या शोभायात्रेने या मंगल विवाह सोहळ्याची सांगता झाली.
---
चौकट
रंगपंचमीस प्रारंभ...
वसंत पंचमीपासून रंगपंचमीपर्यंत दररोज देवाला पांढरा पोशाख परिधान करून रंग उधळण्याची परंपरा आहे. शुक्रवारपासून (ता. २३) देवाची रंगपंचमी सुरू झाली आहे. विठ्ठल-रुक्मिणी विवाह सोहळ्याला शेकडो वर्षांची परंपरा असून, मंदिर समिती ती श्रद्धेने जपते. दिवसेंदिवस या सोहळ्याला भाविकांची वाढती गर्दी दिसत असल्याची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com