
संतांनी आजवर आपल्या साहित्यातून भाषेचा अपूर्व साक्षात्कार आपल्याला घडवला. त्यातूनच वारी म्हणजे अभंग-भाषा-प्रेम-जिव्हाळा सांडणारा प्रवाह झाला.
पंढरपुराजवळ साकारणार विठू माऊलीचे ‘शब्दशिल्प’
पुणे - संतांनी आजवर आपल्या साहित्यातून भाषेचा अपूर्व साक्षात्कार आपल्याला घडवला. त्यातूनच वारी म्हणजे अभंग-भाषा-प्रेम-जिव्हाळा सांडणारा प्रवाह झाला. संत साहित्यातून आणि काव्यातून मराठी भाषा समृद्ध झाली. संतांनी यातून भषिक सहिष्णुतेची महती शिकवली. म्हणूनच त्याचे मूर्त रुप म्हणून विठ्ठलाचे त्रिमितीमधील शब्दशिल्प साकारले जात आहे. वारीच्या शेवटच्या मुक्कामाच्या वाटेवर पंढरपूरजवळ पिराची कुरोली जवळील चिंचणी येथे वीस फूट उंचीच्या या शिल्पाची उभारणी होत आहे.
हे शिल्प साकारण्याची संकल्पना छायाचित्रकार, वारी परंपरेचे अभ्यासक आणि आत्मभान ट्रस्टचे अध्यक्ष संदेश भंडारे यांची आहे. हे शब्दशिल्प प्रत्यक्ष उभारण्याची संपूर्ण जबाबदारी ट्रस्टसह चिंचणी, पिराची (कुरोली) ग्रामस्थांनी पार पाडली आहे. तर, आर्थिक जबाबदारी राज्यातील अनेक संवेदनशील नागरिकांनी घेतली आहे, अशी माहिती भंडारे आणि मोहन अनपट यांनी दिली.
‘भाषा हे पृथ्वीवरील माणसांशी संवाद-संपर्क साधण्यासाठी माणसानेच शोधलेले एक विलक्षण साधन. भाषेने माणसे जोडली गेली, संवाद घडला,परस्पर प्रेम आणि जिव्हाळा वाढला. देश-प्रदेश कोणताही असो माणसांनी भाषा शोधली. संवाद साधला. पंढरपूरची वारी हे विविध भाषा, संस्कृतींचे एकजिनसी अस्तित्व आहे. या अस्तित्वाचे विविध पदर वारकरी संतांनी आपल्या साहित्यातून अजरामर केले आहेत. ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने‘ या संत तुकाराम महाराज यांच्या वचनाचे मूर्त रूप म्हणून हे शब्दशिल्प उभे करण्यात येत आहे’, असे भंडारे यांनी सांगितले.
‘नामदेव, तुकोबा, जनाबाई, चोखामेळा आणि संत शेख महंमद अशा अनेक संतांच्या साहित्यातून मराठी, कोकणी, कानडी, तेलगू, हिंदी, भोजपुरी आणि उर्दू, पर्शियन, अरबी अशा विविध भाषांतील शब्दांचा आणि त्या भाषांचा सहज वापर झालेला दिसतो. त्यामुळे विठ्ठलाच्या रेखाकृतीत साकारलेल्या या शिल्पात मराठीत रुजलेल्या अन्य भाषेतील समानार्थी शब्दांची रेखाटने, तसेच जगभरातील अनेक भाषेतील मराठी शब्द किंवा इतर भाषेतून मराठीने स्वीकारलेले शब्द या विठ्ठलाच्या आकृतीत सामावले आहेत. म्हणून हे शिल्प भाषिक संगम आणि सांस्कृतिक समृद्धतेचे प्रतिकात्मक आहे,’
- संदेश भंडारे, संकल्पक - शब्दशिल्प