पुनरिक्षणात ९२ हजार मतदारांची नोंदणी अनिश्चित

पुनरिक्षणात ९२ हजार मतदारांची नोंदणी अनिश्चित
Published on

तळेगाव दाभाडे, ता. २० : मावळ विधानसभा मतदारसंघातील विशेष सघन पुनरिक्षण (एसआयआर) प्रक्रियेत तब्बल ९२ हजार ६५ मतदारांची नावे पुनरिक्षणात निश्चित झालेली नाहीत. मतदारसंघातील एकूण ३ लाख ८२ हजार ७७८ मतदारांपैकी २ लाख ९० हजार ७२३ मतदारांची नोंदणी (७५.९५ टक्के) निश्चित झाली असून, २४.०५ टक्के मतदारांची नोंदणी पुनरिक्षणात स्पष्ट न झाल्याची प्राथमिक आकडेवारी समोर आली आहे.
मतदारयादीच्या या विशेष पुनरिक्षण मोहिमेत प्रत्येक मतदाराचे वास्तव्य, स्थलांतर, मृत्यू तसेच आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान मतदारांच्या नोंदी निश्चित होऊ शकल्या नसल्याचे समोर आले आहे.

९२ हजार नावे थेट वगळलेली नाहीत!
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, निश्चित न झालेल्या ९२ हजार मतदारांमध्ये स्थलांतरित झालेले, मयत झालेले तसेच विविध कारणांमुळे आवश्यक प्रक्रिया पूर्ण न करू शकलेल्या मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे ही संपूर्ण संख्या मतदारयादीतून थेट वगळलेली आहे, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.

४ नोव्हेंबरला अंतिम मतदारयादी
एसआयआर प्रक्रियेचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. परंतु, पुनरिक्षणानंतर नवीन मतदार नोंदणी तसेच मतदारयादीतील दुरुस्तीची प्रक्रिया ३१ ऑगस्टनंतर सुरू होणार आहे. प्रारूप मतदारयादी ३१ ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यावर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत हरकती नोंदविता येतील. प्राप्त हरकतींवर २९ ऑक्टोबरला सुनावणी घेण्यात येणार असून, ४ नोव्हेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

मतदारांनी नाव तपासणे आवश्यक
एसआयआरनंतर प्रत्येक मतदाराने मतदारयादीत आपले नाव कायम आहे की नाही, याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. नाव आढळून न आल्यास प्रशासनाने निश्चित केलेल्या प्रक्रियेनुसार आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी किंवा दुरुस्तीची कार्यवाही करता येणार आहे.

‘‘मतदारयादीच्या पुनरिक्षणात काही मतदार स्थलांतरित झाल्याचे, तर काही मतदार मयत असल्याचे आढळून आले आहे. तसेच विविध कारणांमुळे ज्या मतदारांनी ‘ए’ फॉर्म भरून दिलेला नाही, अशा मतदारांची नावे पुनरिक्षण प्रक्रियेत वगळण्यात आली आहेत. त्यामुळे पुनरिक्षणात नाव आढळून न आलेल्या प्रत्येक मतदाराचे नाव अपात्र ठरले आहे, असा अर्थ घेता येणार नाही. संबंधित नोंदींच्या स्वरूपानुसार पुढील प्रक्रिया केली जात आहे.’’
- विक्रम देशमुख, तहसीलदार, मावळ
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com