वडगाव पोलिसांकडून चोरीच्या दोन गुन्ह्यांचा छडा

वडगाव पोलिसांकडून चोरीच्या दोन गुन्ह्यांचा छडा
Published on: 

वडगाव निंबाळकर, ता. ६ : जबरी चोरी आणि घरफोडीच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांचा छडा लावण्यात वडगाव निंबाळकर (ता. बारामती) पोलिसांना यश आले आहे. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने पोलिसांनी केलेल्या या कारवाईत दोन्ही गुन्ह्यांतील मुख्य संशयितांना अटक केली आहे. जबरी चोरीच्या गुन्ह्यात दोन लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, तर घरफोडीच्या गुन्ह्यात चोरीला गेलेली वॉशिंग मशीन हस्तगत केली आहे. दोन्ही गुन्ह्यांतील एका विधिसंघर्षग्रस्त बालकासह अन्य सहा आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
बारामती तालुक्यातील लाटे गावच्या हद्दीत जबरी चोरीची घटना घडली होती. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांनी पथक नियुक्त केले. पोलीस उपनिरीक्षक अझर मुलाणी व गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. यात शक्तिमान अविनाश ऊर्फ हणम्या काळे (वय २५, रा. माळेगाव खुर्द, सध्या रा. कांबळेश्वर, ता. बारामती) याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला अटक केली. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून अंदाजे १८ ग्रॅम वजनाचे एक लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण आणि पाच ग्रॅम वजनाचे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे टॉप्स व कर्णफुले, असा एकूण दोन लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यात एका विधिसंघर्षग्रस्त बालकासह आणखी दोन आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.
दरम्यान, बारामती तालुक्यातील मुर्टी येथील घरफोडीच्या दुसऱ्या गुन्ह्याचाही पोलिसांनी छडा लावला. याप्रकरणी सिद्धार्थ सोमनाथ सोनवणे (वय २४, रा. नायगाव, ता. पुरंदर) याला अटक केली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त केले होते. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. संशयित सिद्धार्थ सोनवणे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने अन्य चार साथीदारांसह घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून चोरीला गेलेली वॉशिंग मशीन हस्तगत केली आहे. या गुन्ह्यातील अन्य चार आरोपी फरार असून, ते सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.