वाडी, वस्ती ते जंक्‍शन कासारवाडी

- पीतांबर लोहार
गुरुवार, 2 मार्च 2017

भोसरीची वाडी..., कासाराची वाडी..., लांडे-लांडगे- जवळकर वस्ती... अशा नावांनी एकेकाळी ओळखल्या जाणाऱ्या वसाहतीचे आज स्वतंत्र गाव झाले आहे. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीचे एक उपनगर झाले आहे. महामार्ग, लोहमार्ग, बीआरटी असो वा भविष्यातील मेट्रो, या दळणवळणाच्या मार्गावरील एक जंक्‍शन झाले आहे. ते गाव म्हणजे तुमचे-आमचे कासारवाडी.

भोसरीची वाडी..., कासाराची वाडी..., लांडे-लांडगे- जवळकर वस्ती... अशा नावांनी एकेकाळी ओळखल्या जाणाऱ्या वसाहतीचे आज स्वतंत्र गाव झाले आहे. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीचे एक उपनगर झाले आहे. महामार्ग, लोहमार्ग, बीआरटी असो वा भविष्यातील मेट्रो, या दळणवळणाच्या मार्गावरील एक जंक्‍शन झाले आहे. ते गाव म्हणजे तुमचे-आमचे कासारवाडी.

गावाच्या विस्ताराला मर्यादा
लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाची (सीएमई) हद्द, पवना नदी, पुणे-मुंबई महामार्ग व लोहमार्ग यामुळे कासारवाडीच्या लोकवस्तीचे समांतर तीन भागांत विभाजन झालेले आहे. तसेच भोसरी एमआयडीसी आणि मिल्ट्री डेअरी फार्म यामुळेही कासारवाडीच्या विस्ताराला मर्यादा आलेल्या आहेत. अशा परिस्थितीत आहे त्या जागेवरच घरांची उभारणी झाली आहे, होत आहे. पूर्वीच्या चाळी नष्ट होत असून, उंच इमारती उभ्या राहत आहेत.

बहुराष्ट्रीय कंपन्यांची पसंती
भौगोलिक रचनेचा विचार करता लंबाकार वस्ती, अशी कासारवाडीची रचना आहे. अशाच पद्धतीने अनेक कंपन्यांनी कारखाने व प्रशासकीय कार्यालये सुरू केली आहेत. यात देश-विदेशातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. त्यात सॅंडविक एशिया, फोर्बस्‌ मार्शल, अल्फा लावल, ॲटलास कॉप्को, दाई-ईची यांचा प्राधान्यक्रम लागतो. त्यामुळे रेल्वेने प्रवास करा किंवा बसने, सर्वाधिक कंपन्यांचेच दर्शन कासारवाडीत होते. 

लांडे, लांडगे, जवळकर
आताची कासारवाडी हे ६०-७० वर्षांपूर्वी भोसरीची एक वाडी होती, असे सांगितले जाते. लांडे, लांडगे, जवळकर कुटुंबांची येथे शेती होती, आजही आहे. कालांतराने काही कुटुंबे शेतातच घरे बांधून राहू लागली. एमआयडीसीने आखणी केली. कंपन्या आल्या. पाणीपुरवठ्याची सोय झाली. कामगारांमुळे वस्ती वाढू लागली. शेती जाऊन चाळी निर्माण झाल्या. वस्तीची वाडी झाली. पिंपरी-चिंचवड नगरपालिका स्थापन झाली.

भोसरीसोबत कासारवाडीचाही त्यात समावेश झाला. शहराचा विस्तार होतच राहिला. नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत झाले. कासारवाडी एक स्वतंत्र उपनगर म्हणून नावारूपास आले. असे सांगितले जाते, की कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी भागात बांगड्या विकण्यासाठी एक कासार नेहमी जात असे. मुक्कामाला तो लांडे, लांडगे, जवळकर वस्तीवर थांबत असे. त्यामुळे या वस्तीला कासाराची वाडी अन्‌ पुढे कासारवाडी म्हणून ओळखले जाऊ लागले.

आध्यात्मिकता अन्‌ आधुनिकता
आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज पालखी सोहळा कासारवाडीतूनच जातो. त्या वेळी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. स्थानिकांनी पुणे-मुंबई महामार्गालगत विठ्ठल मंदिर बांधले. मारुती मंदिराचा काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार केला. ग्रामदैवत फिरंगाई देवीचा उत्सव भरतो. पिंपळे गुरव रस्त्यावर श्रीदत्त मंदिर नव्याने बांधले आहे. त्याच शेजारी दर्गा आहे. महापालिकेने उद्यान उभारले आहे. जलतरण तलाव बांधला आहे. बहुमार्गी दुमजली उड्डाण पूल वैशिष्ट्यपूर्ण असून, कासारवाडीच्या लौकिकात भर पडली आहे.

कासारवाडी जंक्‍शन
पुणे-मुंबई लोहमार्गावरील स्थानक
लोकल प्रवाशांचे मध्यवर्ती स्थानक
पुणे-मुंबई महामार्गावरील महत्त्वाचे गाव
पुणे-नाशिक महामार्ग प्रारंभाचे ठिकाण
भोसरी-हिंजवडी आणि दापोडी-निगडी बीआरटी मार्गावरील बस स्थानक 
प्रस्तावित स्वारगेट-पिंपरी मेट्रो मार्गावरील थांबा 
भोसरी एमआयडीसीचे प्रवेशद्वार 

Web Title: wadi wasti to junction kasarwadi