

लोगो : वाई तालुका
....................................
झेडपीचा बिगुल वाजल्याने
गावोगावी पुन्हा खळबळ
गट- गणांमध्ये राजकीय बांधणीला वेग
भद्रेश भाटे : सकाळ वृत्तसेवा
................................
वाई, ता. १५ : पालिका आणि महापालिकांपाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याने ग्रामीण भागात सर्वच पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत, तर अनपेक्षित घडामोडींमुळे गावोगावच्या वातावरणात पुन्हा राजकीय खळबळ निर्माण होण्याचे दिवस येत आहेत.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या महायुतीतील दोन मित्र पक्षात काट्यांची टक्कर पाहावयास मिळणार आहे. मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भारतीय जनता पक्षासह सर्व विरोधक कामाला लागले आहेत.
तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार आणि पंचायत समितीचे आठ गट असून, मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेसाठी चार व पंचायत समितीत सहा, तर काँग्रेसचे पंचायत समितीत दोन सदस्य असे पक्षीय बलाबल राहिले आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत बावधन गणातील सदस्य दीपक ननावरे यांनी माजी आमदार मदन भोसले यांच्यासमवेत भाजपमध्ये प्रवेश केला असून, ते भाजपचे तालुकाध्यक्ष आहेत. या निवडणुकीत जिल्हा परिषदेचा यशवंतनगर गट सर्वसाधारण खुला, भुईंज गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी, तसेच बावधन व ओझर्डे गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहेत, तर पंचायत समितीचे अभेपुरी व बावधन गण सर्वसाधारण, शेंदूरजणे, भुईंज व पाचवड गण सर्वसाधारण महिला, ओझर्डे गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, यशवंतनगर गण अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष या सर्वच पक्षांनी संघटनात्मक बांधणी, निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली संवाद बैठकावर भर दिला आहे. दुसरीकडे इच्छुकांची भाऊगर्दी दिसत असून, इच्छुकांनी नेतेमंडळी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
..........................
आजपासून मुलाखती
भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुकांच्या उद्यापासून (शनिवार) सातारा येथे मुलाखती सुरू होत आहेत. विशेषत: महिला व आरक्षित जागांवर उमेदवार निवडताना दोन्ही पक्षांचा कस लागणार आहे. तालुक्यातील गट आणि गण यांचे संभाव्य उमेदवार कोण याबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता दिसत आहे.
-----------------------------------------
मकरंद पाटील यांचे लक्ष्य ‘बारा झिरो’
या निवडणुकीच्या अनुषंगाने वाई पालिका निवडणुकीतील अपयशाने खचून न जाता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या आठ गणांवर विशेष लक्ष दिले आहे. निवडणुकीची आचार संहिता लागण्यापूर्वीच चारही जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन ‘बारा झिरो’ करण्यासाठी कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचा संदेश दिले आहेत. ग्रामीण भागात पक्षाची पकड मजबूत करून योग्य उमेदवार निश्चितीवर त्यांचा भर राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
-----
भाजपचे धक्कातंत्र
जिल्हा परिषद, पंचायत समितीवर वर्चस्व मिळविण्यासाठी भाजप साम, दाम, दंड, नीती वापरण्याच्या तयारीत आहे.
पालिका निवडणुकीतील यशानंतर भाजप नेते, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला असून ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे आणि ज्येष्ठ नेते मदन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष दीपक ननावरे व महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. सुरभी भोसले यांनी गट व गणनिहाय रणनीती आखण्यास सुरुवात केली. नगराध्यक्ष निवडणुकीत धक्कातंत्राचा उपयोग झाल्याने त्यांची मदार उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादीतील नाराजांवर असणार आहे. त्या दृष्टीने त्यांनी गळ टाकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षातील अनेक दिग्गज कार्यकर्ते संपर्कात असून, लवकरच त्यांचा जाहीर प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायती व सहकारी संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसची असलेली मजबूत पकड सैल करण्यात त्यांना कितपत यश येते, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
------
फोटो :............
मकरंद पाटील, जयकुमार गोरे, नितीन पाटील, मदन भोसले
..................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.