

वाई पालिकेत विकासकामांवरून खडाजंगी
प्रभाग सात-आठमधील निधीवरून राष्ट्रवादी-भाजप आमनेसामने
व्याहळी, ता. ६ : वाई पालिकेच्या नुकतीच झालेली सर्वसाधारण सभा प्रभागनिहाय विकासकामे, निधीची कमतरता आणि प्रशासनाच्या कारभारावरून गाजली. त्यात ६१ विषयांवर चर्चा झाली. बहुतांश विषयांना मंजुरी मिळाली; मात्र प्रभाग क्रमांक ७ आणि ८ मधील विकासकामांवरून झालेल्या वादामुळे काही काळ सभागृहात तणाव निर्माण झाला.
सभेच्या सुरुवातीला प्रभाग आठमधील विकासकामांचे विषय यापूर्वी मंजूर झाले असताना ते पुन्हा सभेसमोर का आणले? असा सवाल राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित शिंदे यांनी केला. आपल्या प्रभागातील कामांमध्ये इतरांनी हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका घेत त्यांनी नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्यावर काही नगरसेवकांना झुकते माप दिल्याचा आरोप केला. भाजपच्या नगरसेविका केतकी पाटणे-मोरे यांनी मंजूर ठराव सभागृहासमोर मांडण्याची मागणी केली. नगराध्यक्ष सावंत, नगरसेवक प्रसाद बनकर आणि विरोधी पक्षनेते विजय ढेकाणे यांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केले. प्रभाग आठमध्ये सुमारे ३५ लाख रुपयांची विकासकामे मंजूर असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
वाई शहरासाठी सुमारे २२ कोटी रुपयांचा सांडपाणी प्रकल्प आणि ७० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना प्रस्तावित असल्याची माहिती दिली. या योजनांसाठी पालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने शासनाकडे एकत्रितपणे पाठपुरावा करण्याची मागणी झाली. नगरसेवक शैलेंद्र देवकुळे यांनी यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले, तर प्रसाद बनकर यांनी मंत्री मकरंद पाटील यांच्यासह मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडेही पाठपुरावा करण्याचे सुचविले.
पालिकेच्या मालकीच्या गाळ्यांचे लिलाव अनेक वर्षांपासून रखडल्याचा मुद्दाही उपस्थित झाला. सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, वीज व प्रकाशव्यवस्थेतील त्रुटी, तसेच फेरनिविदा प्रक्रियेतील पारदर्शकतेवरही नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले. प्रशासनाने विकासकामे, निविदा प्रक्रिया आणि दैनंदिन कामकाजात अधिक नियमितता व पारदर्शकता ठेवावी, अशी मागणी केली.
A00206
वाई ः सभेत कामांच्या निधीवरून वादावादीप्रसंगी नगरसेवक. (प्रशांत थोरवे ः सकाळ छायाचित्रसेवा)
....................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.