Pune News : पुण्याला प्रतीक्षा विस्तारित मेट्रो, विमानतळ विस्तारीकरण प्रकल्पांच्या उद्‍घाटनाची

पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ फेब्रुवारी रोजी सातारा येथे येणार आहेत. त्या दरम्यान, पुण्यातील मेट्रो, विमानतळ प्रकल्पांचे उद्‍घाटन करून लहूजी वस्ताद स्मारकाचे भूमिपूजन ते करतील, अशी सध्या चर्चा आहे.
Pune Metro
Pune Metrosakal

पुणे - पुणे शहरातील रूबी हॉल ते रामवाडी दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे आणि पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणाचेही काम बहुतांश पूर्ण झाले आहे. त्यामुळे त्यांच्या उद्‍घाटनाची पुणेकरांना प्रतीक्षा आहे. तसेच क्रांतिवीर लहूजी वस्ताद यांचे राज्यातील भव्य स्मारक संगमवाडी येथे होणार आहे. त्याचे भूमिपूजनही अल्पावधीत होण्याची चिन्हे आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ फेब्रुवारी रोजी सातारा येथे येणार आहेत. त्या दरम्यान, पुण्यातील मेट्रो, विमानतळ प्रकल्पांचे उद्‍घाटन करून लहूजी वस्ताद स्मारकाचे भूमिपूजन ते करतील, अशी सध्या चर्चा आहे. परंतु, महामेट्रो, पुणे विमानतळ प्रशासन यांच्यापर्यंत याबाबतची ठोस माहिती नाही. तर, लहूजी वस्ताद स्मारकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिल्याचे संयोजकांकडून सांगितले जात आहे.

महामेट्रोचे संचालक हेमंत सोनवणे यांनी सांगितले की, मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. आता केव्हाही उद्‍घाटन शक्य आहे. तर, विमानतळ विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले असून आता उद्‍घाटनाची प्रतीक्षा असल्याचे संचालक संतोष ढोके यांनी सांगितले.

पुणे शहरात मेट्रोच्या पिंपरी चिंचवड-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी मार्गाचे काम सुरू आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०१६ मध्ये सुरू झाला. वनाज-रामवाडी हा टप्पा आता पूर्णत्वास आला आहे. तर, पिंपरी चिंचवड-स्वारगेट मार्गावर शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट दरम्यान चार किलोमीटरचा मेट्रो मार्ग भुयारी आहे.

सध्या त्याचे काम सुरू आहे. ते काम येत्या तीन महिन्यांत पूर्ण होईल, असे महामेट्रोचे म्हणणे आहे. हे काम पूर्ण झाल्यावर पुणे शहरातील पहिल्या टप्प्यातील सुमारे ३१ किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण होईल. त्यासाठी केंद्र सरकारने ११ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

अशी आहे स्थिती

  • डिसेंबर २०१६ : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो प्रकल्पास प्रारंभ

  • ६ मार्च २०२२ वनाज- गरवारे कॉलेज आणि पिंपरी चिंचवड - फुगेवाडी - मार्गाचे उद्‍घाटन

  • १ ऑगस्ट २०२३ : गरवारे कॉलेज ते रूबी हॉल आणि फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय मार्गाचे उद्‍घाटन

  • रूबी हॉल ते रामवाडी - काम पूर्ण परंतु, उद्‍घाटन अनिश्चित

नगर रस्ता मेट्रोला ‘कनेक्ट’ होणार

रूबी हॉल ते रामवाडी हा मेट्रो मार्ग सुमारे ५.५ किलोमीटरचा आहे. त्यात बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी स्थानकाचा समावेश आहे. यातील येरवडा वगळता उर्वरित तिन्ही स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. उद्‍घाटनानंतर प्रवाशांना वनाजवरून थेट नगर रस्त्यावर रामवाडीपर्यंत मेट्रोने प्रवास करता येईल. तसेच शिवाजीनगर स्थानकात मेट्रो बदलून पिंपरी चिंचवडपर्यंतही जाता येईल. या मार्गामुळे नगर रस्त्यावरील प्रवाशांना मेट्रोची कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल.

विमानतळ विस्तारीकरण पूर्ण

पुणे (लोहगाव) विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या प्रकल्पास २०१७ मध्ये प्रारंभ झाला. आता त्याचे काम बहुतांश पूर्ण झाले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने सुमारे ४७६ कोटी रुपये खर्च केले आहेत. उद्‍घाटनानंतर विमानतळावरील एकूण चेक इन काऊंटर्स ३४ होणार आहेत. तर, पाच एरोब्रिज होतील. तसेच प्रती तास सुमारे २३०० प्रवासी विमानतळावरील सुविधांचा वापर करू शकतील, अशा पद्धतीने विस्तारीकरणाचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.

विमानतळावरून सध्या दररोज ९० विमानांची उड्डाणे होतात, तर सुमारे २२ हजार प्रवाशांची वाहतूक होते. उद्‍घाटनानंतर विमानांच्या उड्डाणांची क्षमता ३० ने वाढेल तर, प्रवासी संख्याही १० हजारने वाढेल, असा विमानतळ प्रशासनाचा विश्वास आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प पूर्ण झाला असून आता उद्‍घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही विमानतळ विस्तारीकरणाच्या प्रकल्पाचे अल्पावधीत उद्‍घाटन होईल, असे सुमारे १५ दिवसांपूर्वी पुण्यात सांगितले होते.

लहूजी वस्ताद साळवे स्मारकाचे भूमिपूजन?

क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे यांचे राज्यातील भव्य स्मारक पुण्यातील संगमवाडी येथे होणार आहे. त्यासाठी पुणे महापालिकेच्या माध्यमातून सुमारे ७२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. स्मारकाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने १६१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या स्मारकात शैक्षणिक, आरोग्य, उद्योग-व्यवसाय आदींशी संबंधित प्रकल्प असतील.

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, पोलिस आणि लष्करातील भरतीचे येथे प्रशिक्षण मिळेल. तसेच सुमारे ३५० मुले आणि ३५० मुलींचे वसतीगृह येथे होईल. स्मारकाच्या आराखड्याबाबतच्या निविदाही प्रसिद्ध झाल्या आहेत. आता केव्हाही भूमिपूजन शक्य आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि मातंग समाजातील ज्येष्‍ठ कार्यकर्ते अशोक लोखंडे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com