वाकाव येथे ''सिना संस्कृती'' चे प्रागैतिहासिक अवशेष उजेडात! माढा महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे संशोधन! वाकावमधे तरंगणाऱ्या वीटांचे अवशेषही आढळले ; आंतरराष्ट्रीय व्यापाराचे वाकाव केंद्र

वाकाव येथे ''सिना संस्कृती'' चे प्रागैतिहासिक अवशेष उजेडात!  माढा महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे संशोधन!  वाकावमधे तरंगणाऱ्या वीटांचे अवशेषही आढळले ; आंतरराष्ट्रीय व्यापाराचे वाकाव केंद्र
Published on: 

फोटोओळी :
MDH26B05707
वाकाव (ता. माढा) : येथील गुंडोबा मंदिराला क्षेत्रभेट देणारे माढा महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक.
MDH26B05708
वाकाव (ता. माढा) : संशोधनादरम्यान आढळलेले पुरातत्त्वीय वस्तूंचे अवशेष.

सातवाहनकालीन भांडी, अगेट अन् पाण्यावर तरंगणाऱ्या विटा
वाकावमध्ये सहा हजार वर्षांपूर्वीच्या वसाहतीचे पुरावे; माढा महाविद्यालयाच्या संशोधनात प्रागैतिहासिक अवशेष

किरण चव्हाण / सकाळ वृत्तसेवा
माढा, ता. २२ : सीना नदीकाठच्या वाकाव येथे उत्तर नवाश्मयुगापासून सातवाहन काळापर्यंतच्या मानवी वसाहतींचे पुरावे आढळले आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या माढा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने केलेल्या क्षेत्रभेटीत हस्तकुऱ्हाड, दगडी अवजारे, सातवाहनकालीन भांड्यांचे अवशेष, अगेट खनिज आणि सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या विटांचे अवशेष मिळाले. या आयताकृती विटा चक्क पाण्यावर तरंगतात. यामुळे सीना खोऱ्यातील प्राचीन मानवी वसाहती आणि व्यापाराच्या इतिहासावर नव्याने प्रकाश पडण्याची शक्यता आहे.
दगडी अवजारांपासून सातवाहनकालीन भांड्यांपर्यंत १९ ऑक्टोबरला झालेल्या क्षेत्रभेटीत प्रागैतिहासिक काळातील हस्तकुऱ्हाड आणि अन्य दगडी अवजारे आढळली. ही अवजारे इ.स.पूर्व चौथ्या ते तिसऱ्या सहस्रकातील असावीत, असे इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. रविराज कांबळे, प्रा. डॉ. संतोष बाबरे आणि प्रा. मयूर चव्हाण यांनी सांगितले. याशिवाय, महापाषाण काळापासून इ.स.च्या पहिल्या शतकापर्यंतच्या कालखंडाशी संबंधित धान्य भरडण्याचे दगडी पाटे, लाल-काळ्या रंगांच्या सातवाहनकालीन भांड्यांचे तुकडे आणि धान्य साठविण्याच्या भांड्यांचे अवशेष मिळाले. काही विटा पाण्यावर तरंगत असल्याचेही संशोधकांनी नमूद केले. रोमन सम्राट अंटोनिनस याची नाणी अवगत झाली आहेत. त्यामुळे दुसऱ्या शतकातील सातवाहन कालीन आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्गाचा सिनाकाठासह संबंध राहिला असल्याचे समजते.
-------------------------------
रोमन व्यापाराचे धागे
वाकाव परिसरात अगेट हे खनिजही आढळले. सातवाहन काळात अगेटपासून तयार केलेल्या अलंकारांचा रोमन साम्राज्याशी व्यापार होत असल्याचे ऐतिहासिक संदर्भ आहेत. सीना खोऱ्यात यापूर्वी रोमन सम्राट अंटोनिनस याची नाणी मिळाली होती. त्यामुळे या परिसराचा प्राचीन आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्गाशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी वाकावजवळील केवड येथेही महापाषाण आणि सातवाहनकालीन अवशेष आढळले होते. २०११ आणि २०१२ मध्ये तत्कालीन सोलापूर विद्यापीठाच्या इतिहास विभागालाही वाकाव येथे उत्तर सातवाहनकालीन अवशेष मिळाले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घन:श्याम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या क्षेत्रभेटीत बी.ए. प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचे तसेच बी.एस्सी. तृतीय वर्षाचे विद्यार्थी सहभागी झाले. भूगोल विभागाचे प्रा. डॉ. प्रवीण उघडे उपस्थित होते.
------------------------
चौकट :
MDH26B05709
वाकाव येथे उत्तर नवाश्मयुगापासून सातवाहनकालापर्यंतचे पुरातत्त्वीय अवशेष आढळले आहेत. सीना नदीकाठच्या प्राचीन मानवी वसाहतींच्या इतिहासाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. या अवशेषांचे जतन करून महाविद्यालयात खुले संग्रहालय उभारण्यात येणार आहे.
- प्रा. डॉ. रविराज कांबळे, इतिहास विभागप्रमुख, कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com