#WakeUpUdaySamant सोशल मीडियावर होतेय ट्रेेंड; काय आहे प्रकरण?

ब्रिजमोहन पाटील
Saturday, 23 January 2021

उदय सामंत नाशिक येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या प्रश्नांसंदर्भात बैठक घेतली त्यावेळी मासु चे विभागप्रमुख सिद्धार्थ तेजाळे व इतर पदाधिकारी यांनी उदय सामंत यांची भेट घेऊन म्हणणे मांडले.

पुणे : आॅनलाइन शिक्षणामुळे उच्च व तंत्र शिक्षणच्या अभ्यासक्रमांची शुल्ककपात करावी, परीक्षा न झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सूट द्यावी यासह महाविद्यालये सुरू करावीत अशी मागणी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे वारंवार करण्यात आली. पण विद्यार्थी हिताचा निर्णय न घेता केवळ वेळ काढूपणा केला जात आहे असा आरोप महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने (मासू) केला आहे.
 

उदय सामंत नाशिक येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या प्रश्नांसंदर्भात बैठक घेतली त्यावेळी मासु चे विभागप्रमुख सिद्धार्थ तेजाळे व इतर पदाधिकारी यांनी उदय सामंत यांची भेट घेऊन म्हणणे मांडले. शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये शिक्षण पद्धत ऑनलाइन असल्याने फक्त शिकवणी फी घेतली जावी. पण महाविद्यालये विद्यार्थ्यांना फीसाठी तगादा लावून परीक्षेला अपात्र करत आहेत. शुल्क पूर्ण घेतले जात असले तरी उच्च तंत्र शिक्षण विभाग थेट महाविद्यालय सुरू करत नाही.परीक्षा शुल्काबाबतही कोणताही निर्णय घेतला जात नाही. हे निदर्शनास आणून दिले, पण त्याबाबत ठोस आश्‍वासन दिलेले नाही.

तेजाळे म्हणाले, ‘‘मासू’ने यापूर्वी उदय सामंत यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन, निवेदन देऊन मागण्या सादर केल्या. पण सामंत यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा एकही निर्णय घेतला नाही.

सोशल मिडीयावर सावंत जागो मोहिम
‘मासू’ने विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा यासाठी #WakeUpUdaySamant नावाने सोशल मीडियावर व्हिडिओ मोहीम सुरू केली आहे. राज्यातील मासूचे प्रतिनिधी व विद्यार्थ्यांनी फेसबुक, ट्वीटरवर ,सोशल मीडियावर उदय सामंत यांच्या विरोधात व्हिडिओ टाकून नर्णय न घेतल्याचा निषेध करत आहे. उच्च शिक्षण विभागाला जागे करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे तेजाळे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wake Up Uday Samant is a trend on social media