वाखरी जिल्हा परिषदेच्या जागेवरुन विठ्ठल परिवाराचे  घोडे अडले; कल्याणराव काळे वाखरीच्या जागेवर ठाम

वाखरी जिल्हा परिषदेच्या जागेवरुन विठ्ठल परिवाराचे घोडे अडले; कल्याणराव काळे वाखरीच्या जागेवर ठाम

Published on

UPR26B07280
कल्याणराव काळे
---
UPR26B07281
अभिजित पाटील
---
UPR26B07282
भगीरथ भालके
---
वाखरी जि.प.च्या जागेवरून अडले ‘विठ्ठल’चे घोडे
कल्याणराव काळे वाखरीच्या जागेवर ठाम; भगीरथ भालकेंचाही याच गटावर दावा
भारत नागणे : सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. १७ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, वाखरी जिल्हा परिषदेच्या एका जागेवरून विठ्ठल परिवाराच्या एकीकरणाचे घोडे अडले आहे. येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे या इच्छुक आहेत. तर भगीरथ भालके यांनीही याच गटावर दावा केला आहे. त्यामुळे वाखरी जिल्हा परिषदेच्या एका जागेवरून विठ्ठल परिवारात फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे, गणेश पाटील यांनी परिचारक गटाला युतीचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. काळे- पाटील- परिचारक अशी युती झाल्यास भगीरथ भालके आणि आमदार अभिजित पाटील एकत्र येतील, अशीही चर्चा सुरू झाली आहे. भोसे जिल्हा परिषद गटातून सरपंच गणेश पाटील यांनी त्यांच्या मातु:श्री प्रफुल्लता पाटील यांची उमेदवारी आज (शनिवारी) जाहीर केली आहे. कल्याणराव काळे व इतर नेत्यांची आपणास साथ असल्याचे सूचक विधान गणेश पाटील यांनी केले आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र आलेल्या विठ्ठल परिवारातील धुसफूस समोर आली आहे.
सर्वसाधारण महिलेसाठी खुला असलेल्या वाखरी जिल्हा परिषद गट हा सध्या राजकीयदृष्ट्या कमालीचा हॉटस्पॉट झाला आहे. येथून अनेक मातब्बर महिला निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. यामध्ये भालके गटाकडून सुनीता संग्राम गायकवाड, काळे गटाकडून मोनिका समाधान काळे, आमदार अभिजित पाटील गटाकडून ‘विठ्ठल’चे माजी संचालक सुरेश बागल यांच्या सून मयूरी संतोष बागल, परिचारक गटाकडून प्रीती वामन यलमर तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा वर्षा शिंदे यांचा समावेश आहे.
समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे यांनी महिला मेळाव्यांच्या माध्यमातून गाठीभेटी सुरू केल्या आहेत. तर भालके गटाच्या सुनीता गायकवाड यांनी मागील तीन महिन्यांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवला आहे. मयूरी बागल यांनीही गावोगावी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. वाखरीच्या जागेवर विठ्ठल परिवारातील तिन्ही नेत्यांनी हक्क सांगितल्याने मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. कल्याणराव काळे यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. दरम्यान, कल्याणराव काळे, भगीरथ भालके आणि आमदार अभिजित पाटील हे तिन्ही नेते सध्यातरी वाखरीवर ठाम आहेत. तिन्ही नेते एकत्र बसून वाखरीचा तिढा सोडवणार, की स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार? याकडेच लक्ष लागले आहे.
---
चौकट
आमदार पाटील, काळेंच्या स्वतंत्र मुलाखती
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांनी गावोगावी जाऊन इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे, आमदार अभिजित पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ‘तुतारी’वर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. शनिवारी आमदार पाटील यांनी आपल्या निवासस्थानी ८ जिल्हा परिषद आणि १६ पंचायत समिती गणांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com