‘आपली संस्कृती पूर्वीपासूनच उदारमतवादी’ ; अमिश त्रिपाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

War of Lanka book published

‘आपली संस्कृती पूर्वीपासूनच उदारमतवादी’ ; अमिश त्रिपाठी

पुणे : ‘‘आपण मागासलेलो होतो आणि पाश्चिमात्यांनी येऊन आपला विकास केला, असे पाश्चिमात्यच आपल्याला सांगतात. आपण त्यांच्यावर विश्वासही ठेवला. पण ते खरे नाही. आपण पूर्वीपासूनच उदारमतवादी आहोत. आपली संस्कृती अतिशय समृद्ध होती. ज्या गोष्टी आपण पाश्चिमात्यांकडून शिकलो, असे सांगितले जाते, त्या खरेतर आपल्याकडे पूर्वीपासूनच होत्या. आपल्याला याचे विस्मरण झाले असून संस्कृतीचे व इतिहासाचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे’’, असे मत प्रख्यात लेखक अमिश त्रिपाठी यांनी मंगळवारी व्यक्त केले.

त्रिपाठी यांच्या ‘वॉर ऑफ लंका’ (लंकेचे युद्ध) या पुस्तकाचे प्रकाशन औंध येथील क्रॉसवर्डमध्ये झाले, त्यावेळी ते बोलत होते. त्रिपाठी यांच्या ‘रामचंद्र’ पुस्तक मालिकेतील हे चौथे पुस्तक आहे. राजकीय विश्लेषक तहसीन पूनावाला यांनी त्रिपाठी यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्रिपाठी यांचे विचार ऐकण्यासाठी आणि पुस्तकावर त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी तरुणाईने मोठी गर्दी केली होती.

त्रिपाठी म्हणाले, ‘‘माणसाच्या जीवनाशी श्वासाचे जितके अतूट नाते आहे, तितकेच अतूट नाते रामायणाचे भारताशी आहे. कालपरत्वे रामायणाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या, पण त्याचा आत्मा कायम राहिला. हेच रामायण, महाभारताचे वैशिष्ट्य आहे. भारतीय व्यक्ती कधीच आपल्या देवदेतांच्या कथा ऐकण्यास कंटाळत नाही, हे त्यामागचे कारण आहे. आपल्या एकसंधपणाचे हे एक ठळक उदाहरण आहे.’’

‘‘भारतीय संस्कृतीत चांगले आणि वाईट अशी सोपी विभागणी करता येत नाही. देव नायक आणि असुर खलनायक, असे चित्रण कुठेच नाहीच. आपले काम हेच आहे, की या कथा समजून घ्याव्या, त्यापासून शिकावे, प्रत्यक्ष जीवनात शिकलेल्या गोष्टींची अंमलबजावणी करावी आणि त्याच्या परिणामांनाही सामोरे जावे. तुमचे आयुष्य तुमच्या हातात आहे. आयुष्यातील प्रत्येक निर्णयाचे स्वातंत्र्य आपली संस्कृती देते’’, असे त्रिपाठी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

‘माझेही पहिले पुस्तक नाकारले होते’

‘‘माझे पहिले पुस्तक प्रत्येक प्रकाशकाने नाकारले होते. आजकाल प्रत्येकाला प्रेमकथा वाचायची असते. धार्मिक विषयांवरची पुस्तके कोणी वाचत नाही. आजचा मोठा वाचकवर्ग हा तरुण आहे. ते फार मोठी पुस्तके वाचत नाही. तुमच्या प्रत्येक दोन किंवा तीन प्रकरणांनंतर खूप उपदेश असतो, अशी अनेक कारणे यासाठी देण्यात आली.

लोकांना इतके वैचारिक काही नको असते, असा सल्लाही मला एका व्यक्तीने दिला. पण मला हे पटत नाही. काही वेळा लोकांना फारसा विचार न करायला लावणारे रंजक काहीतरी हवे असते, तर कधीतरी वैचारिक हवे असते. त्यामुळेच माझी पुस्तके मोठ्या प्रमाणावर खपतात’’, असे मत अमिश त्रिपाठी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Pune NewsBookAuthersAundh