Water Issue : सावधान, पाणीसाठा झपाट्याने घटतोय! भाटघर धरणाच्या जुन्या भिंतीचे दर्शन

भाटघर धरणात (ता. भोर) सध्या २९ टक्के, तर नीरा देवघर धरणात २४.८२ टक्के पाणीसाठा आहे.
bhatghar dam water
bhatghar dam watersakal
Updated on

भोर - भाटघर धरणात (ता. भोर) सध्या २९ टक्के, तर नीरा देवघर धरणात २४.८२ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी १६ एप्रिलला भाटघर धरणात १३.६८ टक्के, तर नीरा देवघर धरणात २८.३२ टक्के पाणीसाठा होता. दोन्ही धरणांच्या वीजनिर्मिती केंद्रातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

भाटघर धरणातील पाणीसाठा हा गतवर्षीपेक्षा १५ टक्क्यांनी जास्त असला, तरीही सद्यःस्थितीत धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून २ हजार ५९ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी काही दिवसांतच कमी होणार आहे. सध्या भाटघर धरणाच्या पाण्यातील जुन्या धरणाची (लेक व्हाईटिंग धरणाची) भिंत दिसू लागली आहे.

पाणीटंचाईचे संकट

नीरा देवघर धरणातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा कमी झाला आहे. नीरा देवघर धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून ७५० क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे नीरा देवघर धरण खोऱ्यातील गावांमधील विहिरींची पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे हिर्डोशी खोऱ्यात पाण्याची टंचाई भासू लागली आहे.

भाटघर धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांसाठी पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानंतर भाटघर धरण खोऱ्यातील गावांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

कुकडी प्रकल्पात २.२९ टक्के कमी साठा

नारायणगाव, ता. १६ : कुकडी प्रकल्पात आजअखेर ४.७२ टीएमसी (१६.०५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. वाढलेल्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा दर वाढल्याने पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे.

गतवर्षी प्रकल्पात आजअखेर ५.४४३ टीएमसी (१८.३४ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. तुलनात्मकदृष्ट्या गतवर्षाच्या तुलनेत प्रकल्पात ०.६८१ टीएमसी (२.२९ टक्के) कमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने बाष्पीभवनाचा दर वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पाणी सोडण्याची मागणी वाढली आहे. प्रकल्पीय पाणीसाठ्याची सद्यस्थिती पाहता या पुढील काळात शेतीसाठी पाणी सोडता येणार नाही.

मात्र, कालवा सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर उपलब्ध पाण्याचे नियोजन करून बंदोबस्तात पिण्यासाठी सर्व कालव्यात पाणी कसे सोडता येईल, याबाबतचे नियोजन कुकडी पाटबंधारे विभाग करत आहे, अशी माहिती उपकार्यकारी अभियंता रवींद्र हांडे यांनी दिली.

कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात १५ ऑक्टोबर २०२४ अखेर २६.७४५ टीएमसी (९० टक्के) उपयुक्त पाणी साठा झाला होता. कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार १० डिसेंबर २०२४ ते १८ जानेवारी २०२५ दरम्यान रब्बीच्या पहिले, तर २० फेब्रुवारी २०२५ ते मार्चअखेर रब्बी- उन्हाळी, अशी दोन आवर्तन कुकडी पाटबंधारे विभागाने सोडली होती.

दोन्ही आवर्तने मिळून एकूण १४.९७ टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला. या आवर्तनाचा लाभ जुन्नर, आंबेगाव, शिरूर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा, पारनेर या तालुक्यातील सुमारे सव्वालाख एकर क्षेत्रातील शेती पिकांना झाला.

मागील काही वर्षात सिंचनाखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. प्रकल्प क्षेत्रातील सात तालुक्यांत ऊस, फळबागा, भाजीपाला पिकाखालील क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पाणी मागणीबरोबरच संघर्षही वाढला आहे.

संघर्ष होण्याची शक्यता

धरणातील पाणीसाठ्याची सद्यःस्थिती पाहता सुमारे ५४५ किलोमीटर लांबीच्या कुकडी डावा कालव्यात पिण्यासाठी आवर्तन सोडायचे झाल्यास पिंपळगाव जोगे धरणातील मृतसाठ्याचा व डिंभे धरणातील उपयुक्त पाणी साठ्याचा पाण्याचा वापर करावा लागणार आहे.

मात्र, पिंपळगाव जोगे धरणातील मृतसाठ्याचा वापर करण्यास आदिवासी भागातील शेतकऱ्यांचा विरोध असल्याने एप्रिलनंतर पाण्यासाठी संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com