जुनी सांगवी परिसराची साफसफाई कचऱ्याच्या ‘ढिगाऱ्यात’
पिंपळे गुरव, ता. १५ ः जुनी सांगवी येथील शकुंतलाबाई शितोळे शाळेजवळील साठ फुटी रस्ता, सांगवी-औंध पूल परिसर, मुळानगर, ढोरेनगर कॉर्नर, दत्त आश्रम परिसर तसेच पेट्रोल पंप ते ममतानगर रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचत असल्याने परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. तेथे भटके श्वान, जनावरे व पक्षी मोठ्या प्रमाणात जमत असून नागरिकांना दुर्गंधीमुळे रस्त्यांवरून चालणेही कठीण झाले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने शहर कचराकुंडी मुक्त करण्याचा उपक्रम राबवण्यात आला आहे. इंदूरच्या धर्तीवर हा उपक्रम राबवत शहर कचराकुंडी मुक्त झाल्याचा गाजावाजा देखील करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात काही भागांमध्ये कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जुनी सांगवी परिसरातील सर्वच ठिकाणी कचराकुंड्या काढून टाकण्यात आल्यामुळे घंटागाडी एकदा येऊन गेल्यानंतर उरलेला कचरा टाकायचा कुठे ?, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहतो. अनेक नागरिक, व्यावसायिक व नोकरदारांना घंटागाडीच्या ठराविक वेळेत कचरा देणे शक्य होत नाही. परिणामी, सायंकाळच्या वेळेत काही नागरिक व व्यावसायिक रस्त्याच्या कडेला किंवा पदपथावर कचरा टाकत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी हा कचरा दोन ते तीन दिवसांपासून उचलला गेला नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
उपाय योजना काय ?
- घंटागाड्यांच्या फेऱ्या वाढवून कचरा नियमित उचलणे
- नागरिक, व्यावसायिकांना सोयीस्कर अशा वेळेत कचरा संकलन करणे
- वारंवार कचरा साचतो, तेथे तात्पुरत्या कचरा संकलनाची व्यवस्था करणे
- पदपथ व रस्त्यांवर साचलेला कचरा तातडीने उचलण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविणे
- सीसीटीव्ही किंवा दंडात्मक कारवाई करून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवावे
- नागरिकांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती मोहीम राबविणे
- भटके श्वान व मोकाट जनावरांमुळे कचरा पसरू नये यासाठी उपाय योजना करणे
- कचरा संकलनासाठी अतिरिक्त मनुष्यबळ व वाहने उपलब्ध करून देणे
प्रभाग क्र.३२, जुनी सांगवी येथील घंटागाडी नादुरुस्त झाल्यामुळे काही ठिकाणी कचरा उचलता आला नाही. याबाबतची माहिती आताच मिळाली असून लवकरात लवकर कचरा उचलण्याची व्यवस्था करण्यात येईल.
- अंकुश झिटे, सहाय्यक आरोग्य अधिकारी
अपुऱ्या घंटागाड्या आणि ढिसाळ कचरा व्यवस्थापनामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांकडून नागरिकांचे फोनही घेतले जात नसल्याची तक्रार आहे. वेळेवर घंटागाडी आली, तर नागरिक रस्त्यावर कचरा टाकणार नाहीत.
- दिलीप तनपुरे, स्थानिक नागरिक
PMG26B03201
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

