कचऱ्याचा पुनर्वापर शक्‍य

कचऱ्याचा पुनर्वापर शक्‍य

पिंपरी - शहरात रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा पुनर्वापर शक्‍य असल्याचे महापालिकेतर्फे राबविल्या जात असलेल्या विविध प्रकल्पांमुळे स्पष्ट झाले आहे. मात्र, या प्रकल्पांची क्षमता वाढविण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे कचऱ्याचे शंभर टक्के निराकरण होऊ शकते. 

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. त्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवीत आहे. शंभर सदनिकांच्या सोसायटीने आपला कचरा सोसायटीतच जिरविण्याची व्यवस्था करायची आहे. तसेच, कचऱ्याचा पुनर्वापर, पुनर्भरण, कचऱ्याचे प्रमाण जागेवर कमी करणे यावर भर दिला जात आहे. यात सेंद्रिय खत, गांडूळ खत निर्मिती, इंधन निर्मिती, प्लॅस्टिक ब्लॉक निर्मिती, कोको पावडर व काथ्या निर्मिती केली जात आहे. मात्र, त्यांची क्षमता वाढविण्याची गरज आहे.

मेकॅनिकल कंपोस्टिंग (खतप्रक्रिया) 
कचऱ्यातील विघटनशील घटकांपासून जिवाणूंच्या साह्याने खत तयार करण्याच्या प्रक्रियेला कंपोस्टिंग म्हटले जाते. मोशी कचरा डेपोतील कंपोस्टिंग युनिटमध्ये रोज सुमारे ४३५ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. 

गांडूळ खत प्रकल्प
महापालिकेने जेएनएनयुआरएम अंतर्गत पीपीपी तत्त्वावर मोशी डेपो परिसरात सुमारे दोन हेक्‍टर जागेत गांडूळ खत प्रकल्प उभारला आहे. त्याची क्षमता रोज ३० मेट्रिक टन आहे. सद्या मंडईतील सुमारे १५ टन कचऱ्यावर मलनिस्सारण प्रकल्पातील १८ टन एसटीपी स्लज मिसळून गांडूळ खत निर्माण केले जात आहे. 

प्लॅस्टिकपासून इंधननिर्मिती 
कचऱ्यातील प्लॅस्टिकपासून इंधननिर्मिती प्रकल्पाची क्षमता पाच मेट्रिक टन आहे. सध्या रोज सुमारे दोन मेट्रिक टन प्लॅस्टिकवर प्रक्रिया केली जात आहे. त्यापासून एलपीजी व डिझेलसदृश इंधन तयार होते. त्याचा वापर औद्योगिक क्षेत्रात केला जात आहे. 

पेव्हिंग व दुभाजक ब्लॉक
मोशी कचरा डेपोच्या आवारात प्लॅस्टिकपासून इंधन निर्मितीबरोबरच पेव्हिंग ब्लॉक व रस्ता दुभाजक ब्लॉक तयार केले जात आहेत. ते प्रायोगिक तत्त्वावर सुरू असून, त्याची क्षमता वाढविल्यास प्लॅस्टिक कचऱ्यापासून शहराची मुक्तता करणे शक्‍य होईल. 

पुनर्भरण व लॅपिंग
शास्त्रीय पद्धतीने कचरा जमिनीमध्ये पुरला जात आहे. त्यालाच पुनर्भरण असे म्हणतात. तसेच, गेल्या २२ वर्षांपासून मोशी डेपोत टाकलेल्या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने कॅपिंग केले आहे. त्यासाठी चार लाख घनमीटर कचऱ्याचा वापर केला आहे. 

मॅकेनिकल कंपोस्ट प्लॅंट आणि गांडूळ खत प्रकल्पातून खत तयार होते. नियोजित वेस्ट टु एनर्जी प्रकल्पातून राख, तर सी ॲण्ड डी वेस्ट प्रकल्पातून विटा व इतर वस्तूंची निर्मिती करण्याचे नियोजन आहे.
- दिलीप गावडे,  अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com