

कचऱ्याचे होणार कोळशात रूपांतर
सोनगाव डेपोत ५० ते ६० कोटींचा प्रकल्प प्रस्तावित; पालिकेची गोरखपूरला भेट
सातारा, ता. १४ : सातारा शहरासह विस्तारित भाग आणि लगतच्या १८ ग्रामपंचायतींमधून संकलित कचऱ्यावर पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोत प्रक्रिया केली जाते. संकलित कचऱ्यापैकी ४० टक्के कचऱ्यापासू्न खतनिर्मिती होत असलीतरी उर्वरित कचरा प्रक्रियेअभावी तसाच पडून राहतो. अशा पडून राहणाऱ्या कचऱ्यापासून कोळसानिर्मिती करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या विचाराधीन आहे. यासाठी पालिका प्रशासनाने नुकतीच उत्तर प्रदेश येथील गोरखपूर येथील एका प्रकल्पाची पाहणी केली.
सातारा शहरासह विस्तारित भागातील कचरा संकलनासाठी सुमारे ६० हून अधिक घंटागाड्या कार्यरत आहेत. या घंटागाड्यांबरोबरच सार्वजनिक ठिकाणांची सफाई करत त्याठिकाणच्या कचऱ्या संकलन करण्याचे काम देखील स्वतंत्र यंत्रणे मार्फतीने करण्यात येते. हा कचरा सोनगाव डेपोत नेत विलगीकरण, विघटनासह इतर प्रक्रिया केल्या जातात. सद्यःस्थितीत दररोज सुमारे ६० टन कचऱ्याचे संकलन होत असल्याची नोंद पालिकेच्या आरोग्य विभागाकडे आहे.
संकलित कचऱ्यापैकी २४ ते २५ टन कचऱ्यावर प्रक्रिया करत त्यापासू्न खतनिर्मिती करण्यात येते. प्रक्रियेविना सुमारे ३४ ते ३५ टन कचरा डेपोत प्रक्रियेविना पडून राहतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेस प्रचंड मोठी यंत्रणा वापरावी लागते. यासाठी लागणारी यंत्रणा व वेळेचा विचार करत पालिकेवर मोठा आर्थिक ताण येतो. हा ताण कमी करण्यासह प्रक्रियेविना पडून राहणाऱ्या कचऱ्यापासून कोळसा तयार करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या विचारात आला. यानुसार मुख्याधिकारी विनोद जळक, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नियंत्रण अधिकारी दिलीप चिद्रे, सुधीर चव्हाण, रोहित माळी यांनी नुकतीच उत्तर प्रदेश येथील गोरखपूर येथील एका प्रकल्पास भेट देत पाहणी केली. या प्रकल्पात कचऱ्यापासून कोळसा तयार केला जातो.
...........
पालिकांना अतिरिक्त उत्पन्न
गोरखपूर, वाराणसी, हुबळी येथेही कचऱ्यापासून कोळसानिर्मिती करण्यात येते. याठिकाणी तयार झालेला कोळसा नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनला विकला जातो. यातून त्या त्या ठिकाणच्या पालिका आणि महापालिकांना अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे.
...........
सर्वसाधारण सभेत चर्चा
कचऱ्यापासून कोळसानिर्मितीच्या १०० ते १५० टन प्रक्रिया प्रकल्पावर येत्या काळात सर्वसाधारण सभेत चर्चा होईल. हा प्रकल्प उभारण्यासाठी पालिकेवर कोणताही बोजा पडणार असून, संकलित कचऱ्याचे संपूर्ण विल्हेवाट लावणे या प्रकल्पामुळे शक्य होणार आहे.
- धनंजय जांभळे, आरोग्य सभापती, सातारा.
.......
प्रकल्प क्षमता : १०० ते १५० टन
कोळसानिर्मिती : सुमारे ६० टन
प्रकल्प किंमत : सुमारे ५० ते ६० कोटी
...........
विधायकतेचा लोगो वापरणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.