कऱ्हाड शेतकऱ्यांनो आधी अर्ज करा, अन्यथा शेतीला पाण्याचा मिळणार नाही

कऱ्हाड शेतकऱ्यांनो आधी अर्ज करा, अन्यथा शेतीला पाण्याचा मिळणार नाही
Published on: 

अन्यथा शेतीला पाण्याचा नाही

अर्ज करण्याचे ‘पाटबंधारे’चे आवाहन; बळीराजाची कसरत

कऱ्हाड, ता. २६ ः वाळत चाललेली पिके जगवायची की गोठ्यातील जनावरांची तहान भागवायची, अशा दुहेरी संकटात सापडलेला येथील शेतकरी प्रशासकीय नियमांच्या फेऱ्यात अडकला आहे. यंदाच्या रब्बी हंगामात विहिरी आणि धरणांमधील पाण्याचा थेंब अन् थेंब मोजावा लागणार असल्याने, आधी पाणी मागणीचा अर्ज भरा, मगच कोटा ठरणार, असा स्पष्ट इशारा तारळी सिंचन विभागाने दिला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याला पहिले प्राधान्य मिळणार असल्याने, शेती सिंचनाला कात्री लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन ऊसलागवडीचे स्वप्न आणि रब्बी पिकांचे गणित जुळवताना बळीराजाची तारेवरची कसरत होणार आहे.
यंदाच्या रब्बी हंगामासाठी कोयना, तारळी, वांग आणि मोरणा-गुरेघर प्रकल्पांतून शेतीला पाणी हवे असलेल्या शेतकऱ्यांनी नमुना सात व सहा अ नुसार मागणी अर्ज सादर करावेत, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. वेळेत अर्ज न केल्यास संबंधित शेतकऱ्यांसाठी पाणी कोटा राखून ठेवता येणार नसल्याचेही म्हटले आहे. दुष्काळाच्या संभाव्य तीव्रतेमुळे धरणांतील पाणीसाठ्याचे नियोजन व पिण्याच्या पाण्याचा साठा राखून ठेवण्यास प्राधान्य दिले आहे. परिणामी सिंचनाच्या पाणी वाटपावर मर्यादा येणार असल्याने रब्बीचे वेळापत्रक, पिकांची निवड आणि नवीन ऊस लागवडीचा फेरविचार करावा लागणार आहे. उपलब्ध पाण्याचा अंदाज न घेता लागवड केल्यास पुढील काळात पिके जगविणे मुश्‍कील होईल, अधिक पाणी लागणारे पीक म्हणजे ऊस, त्यात नवीन ऊसलागवड करताना शेतकऱ्यांना पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करावा. सिंचनासाठी किती पाणी मिळणार, ते किती काळ पुरणार आणि अन्य पिकांची गरज कशी भागवायची, त्याचे नियोजन करावे लागेल. पाण्याच्या कमतरतेचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्याचा चारा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पिकांसोबतच जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्थेचे आव्हान आहे. दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा अपव्यय टाळणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाणी मागणीचे अर्ज निर्धारित मुदतीत सादर करावेत, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊनच पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.


............
चौकट
..............
अनधिकृत उपसा
केल्यास कारवाई

अनधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा पाटबंधारे विभागाने इशारा दिला आहे. नियमबाह्य पाणी उपसा केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासह विद्युत मोटारी सील करणे, महावितरणच्या समन्वयाने वीजपुरवठा खंडितचीही कार्यवाही होऊ शकते, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com