जलसमृद्धी रोखेल शेतकरी आत्महत्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ः पूर्ती सिंचन समृद्धी संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त ‘जलसंवाद’

जलसमृद्धी रोखेल शेतकरी आत्महत्या 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ः पूर्ती सिंचन समृद्धी संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त ‘जलसंवाद’
Published on

सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता.१७ : विदर्भात दहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षात आत्महत्या केल्यात. त्यामागे सिंचनाचा अभाव असल्याचे समोर आले. या आत्महत्या रोखायच्या असतील तर जलसमृद्धी हा एकमेव मार्ग आहे. त्या दिशेने काम सुरु केले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांच्या विदर्भ रथयात्रा दौऱ्याच्या वेळी आत्महत्याग्रस्त कुटुंबांशी संवाद साधताना ही बाब लक्षात आल्याचे सांगून गडकरी यांनी इतिहासाला उजाळा दिला.
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त स्थानिक वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित ‘जलसंवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यावरणवादी अनिल जोशी, उमाशंकर पांडे, सेठपाल सिंग, पर्यावरण तज्ज्ञ स्वेडेविनो नात्सो, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले की, धापेवाडा येथील ६० एकर शेतीच माझी प्रयोगशाळा आहे. बरेच प्रयोग अयशस्वी झाले. मात्र, यशस्वी प्रयोगाने शेती करण्याचे बळ दिले. जलसंर्वधनासाठी नाला खोलीकरण केले, त्याचा फायदा झाला. प्रयोग म्हणून पहिल्या टप्प्यात वर्धा जिल्ह्यातील तामसवाडा येथे जलसंधारणाचे काम हाती घेण्यात आले. पुढे ‘तामसवाडा पॅटर्न’ म्हणून हा प्रयोग देशभर चर्चेत आला. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही. जलव्यवस्थापन केवळ शासनाची जबाबदारी नाही. ती लोकचळवळ व्हावी, या उद्देशाने काम सुरू आहे. जलसंवाद कार्यक्रमात तज्ज्ञांनी नमुद केलेल्या सूचनांवर काम केले जाईल, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली.
......................
बदलण्यासाठी समाजाला जागवण्याची गरज
शेतकऱ्यांचा देवावर आणि सरकारवर जास्त विश्वास आहे. सरकारच्या योजना आहेतच, पण देश बदलायचा असेल तर समाजाला, व्यक्तीला जागवण्याची गरज आहे. गत २५ वर्षांपासून पूर्ती सिंचन समृद्धी संस्थेच्या मार्फत चालविलेल्या लोकचळवळीनंतर हे कळले. याच अनुभवातून सिंचन क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेत पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेची उभारणी केल्याचे गडकरी यांनी सांगितले.
.....................
जलसंवर्धनाचे शिक्षण देणारे विद्यापीठ व्हावे ः पांडे
आईच्या गर्भापासून तर मृत्युपश्चात अस्थी विसर्जनापर्यंतचा प्रवास पाण्याशी संबंधित आहे. मात्र, जलसंवर्धनाचे शिक्षण देणारे एकही विद्यापीठ देशात नाही. देशात एका मिनिटाला २० हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे. देशातील ३१ शहरांत पाणीच नाही, ही वस्तुस्थिती आहे. पाणी विकून पाणी बनवता येत नाही, त्यामुळे आपल्याकडे पडणाऱ्या पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे, असे मत उमाशंकर पांडे यांनी व्यक्त केले.
.....................
चळवळ होणार देशव्यापी ः पद्मश्री जोशी
जल, जंगल, जमीन याच्या संवर्धनासाठीही संघटनेची आवश्यकता आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी देशाला सडक मार्गांनी जोडले. त्यांच्यासाठी देशभरात जलसंवर्धन चळवळ उभी करायला वेळ लागणार नाही. ही चळवळ देशव्यापी होईल, असा आशावाद पद्मश्री अनिल जोशी यांनी व्यक्त केला.
.....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalna News
Nagpur News
Achalpur irrigation model
Buldhana News
Marathi News Esakal
www.esakal.com