पुणे जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना वेग

पुणे जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना वेग
Published on

जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना वेग

जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्यावर भर

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : पावसाचे पाणी अडवणे, जमिनीत मुरवणे, जलसाठ्यांची क्षमता वाढविणे आणि शेतीसाठी शाश्वत पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात विविध योजनांच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे वेगाने सुरू आहेत. बदलते हवामान, पावसाचे बदलते स्वरूप आणि वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंधारणाला ग्रामीण विकासाचा महत्त्वाचा आधार देण्यात आला आहे.

गाळमुक्त धरण–गाळयुक्त शिवार योजना, जलयुक्त शिवार अभियान २.० आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना–पाणलोट विकास घटक २.० या प्रमुख योजनांच्या माध्यमातून जलसाठे निर्माण करणे, जुन्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, गाळ काढणे, नाला खोलीकरण, मृद्‍संधारण आणि सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

--- चौकट ---
तब्बल १२.३५ लाख घनमीटर गाळ उपसा :
गाळमुक्त धरण–गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात १५ जूनपर्यंत जलाशयातील गाळ काढण्याची ४५ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी ३८ कामांतून १२.३५ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तसेच नाला खोलीकरणाच्या सहा कामांपैकी तीन कामांतून ०.८५ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला. जलाशयांची साठवण क्षमता वाढण्याबरोबरच हा गाळ शेतात वापरल्याने जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होत आहे.
-----------

कामांवर डिजिटल देखरेख :
जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत कामांच्या पारदर्शकतेसाठी जिओ पोर्टलचा वापर केला जात आहे. जिल्ह्यात ५ हजार ५३२ कामांची नोंद अपेक्षित असून, आतापर्यंत ४ हजार ४८७ कामांचे वर्क आयडी तयार झाले आहेत. त्यापैकी २ हजार ५१० कामांचे जिओ-टॅगिंग पूर्ण झाले आहे. विशेष निधीतून जिल्ह्यातील १८६ गावांमध्ये ८४८ कामांचा समावेश करण्यात आला होता. त्यासाठी २ हजार ८२२ लाख रुपयांचा आराखडा असून सर्व कामे पूर्ण झाली आहेत. यासाठी २ हजार ११८.६२ लाख रुपये खर्च झाला आहे. विविध विभागांच्या योजनांच्या अभिसरणातून याच १८६ गावांमध्ये आणखी ४ हजार ६८४ कामांचा समावेश करण्यात आला आहे.

११ गावांमध्ये पाणलोट विकास
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना–पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत वाफगाव, वरुडे, चौधरवाडी, गाडकवाडी, गुळाणी, कन्हेरसर, पूर, चिचबाईवाडी, जऊळके बु., गोसासी आणि वाकळवाडी या ११ गावांमध्ये पाणलोट विकासाची कामे सुरू आहेत. नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन घटकासाठी ७०७.४३ लाख रुपये मंजूर असून १३९ मृद्‍ व जलसंधारणाच्या कामांपैकी १२१ कामे पूर्ण झाली आहेत. त्यासाठी ६७८.६० लाख रुपये खर्च झाला आहे. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा यासाठी पीव्हीसी पाइप, विद्युत पंप, ठिबक व तुषार सिंचन तसेच कृषी यंत्रे व अवजारांसाठीही अनुदान दिले जात आहे. मंजूर १४७.५१ लाख रुपयांपैकी १३१.९४ लाख रुपये खर्च झाले आहेत.
कृषी, वन, मृद्‍ व जलसंधारण, भूजल सर्वेक्षण व विकास, सामाजिक वनीकरण आणि मनरेगा यंत्रणांच्या समन्वयातून ही कामे राबविली जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com