बंधाऱ्यांवरील ढाप्यांना आता ‘टाइमटेबल’

बंधाऱ्यांवरील ढाप्यांना आता ‘टाइमटेबल’
Published on

पुणे, ता. १८ : पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग व्हावा, यासाठी पाणी साठवण बंधाऱ्यांवरील ढापे वेळेत बसविण्याबरोबरच पावसाळ्यानंतर ते वेळेत काढण्यावर जिल्हा परिषदेने भर दिला आहे. यामुळे जलसंधारण होण्यासाठी मदत होणार आहे.
पाणी अडविण्याच्या प्रक्रियेत बंधाऱ्यांवर अतिरिक्त ताण येऊ नये, यासाठी निश्चित वेळापत्रकानुसार ढापे बसविणे आणि काढणे आवश्यक केले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ३०८ कामांना २२६.८० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.


पावसाळ्यात नदी, नाले आणि ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी येते. हे पाणी वाहून जाण्याऐवजी बंधाऱ्यांमध्ये अडविल्यास त्याचा उपयोग शेती, पिण्याचे पाणी आणि भूजल पुनर्भरणासाठी होतो. याबाबत जिल्हा जलसंधारण अधिकारी गौरव बोरकर म्हणाले की, पाणी साठवण बंधाऱ्यांवरील ढापे बसविणे आणि काढण्यासाठी निश्चित वेळापत्रक आहे. त्यानुसार पाणी अडविण्याच्या हंगामात ढापे वेळेत बसविणे, तसेच हंगाम संपल्यानंतर ते वेळेत काढणे आवश्यक आहे. या वेळापत्रकाचे पालन झाल्यास उपलब्ध पाण्याचा अधिकाधिक उपयोग करता येण्याबरोबरच बंधाऱ्यांवरील अतिरिक्त ताण टाळता येणार आहे.


ग्रामपंचायतींना निम्मा खर्च करणे बंधनकारक
जिल्हा परिषद निधीतून जिल्ह्यातील ३०८ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामांसाठी एकूण २२६.८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीपैकी ५० टक्के निधी ग्रामपंचायत स्तरावरून खर्च करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी संबंधित निधी ग्रामपंचायतींकडे वर्ग करण्यात आला आहे.

दृष्टिक्षेपात
- वेळापत्रकानुसार १५ सप्टेंबरपर्यंत बंधाऱ्यांचे ढापे बसविणे
- ढापे वेळेत बसविणे आणि काढण्याच्या कामात ग्रामपंचायतींचा सहभाग महत्त्वाचा
- बंधाऱ्यांची स्थिती, पाण्याची पातळी आणि पावसाची स्थिती यावर लक्ष ठेवावे लागणार
- ग्रामपंचायतींना तीन टप्प्यांमध्ये छायाचित्रे काढावी लागणार
- योग्य वेळी ढापे काढल्याने बंधाऱ्यांची सुरक्षितता राखली जाणार
- ग्रामपंचायतींच्या आर्थिक सहभागासह स्थानिक देखरेखीवर भर


जिल्ह्यातील एकूण बंधाऱ्यांची संख्या - ५६७
प्रशासकीय मान्यता मिळालेली कामे - ३०८
मंजूर निधी - २२६.८० लाख रुपये


ग्रामपंचायतींनी ढापे बसविणे आणि काढण्याच्या निश्चित वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे. उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून जलसंधारणाला बळ देतानाच बंधाऱ्यांची सुरक्षितताही जपणे आवश्यक आहे.
- वीरधवल जगदाळे, अध्यक्ष, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com