पानवडीची वाटचाल जलसंपदेतून धनसंपदेकडे 

डी. आर. कुलकर्णी
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

पुणे : धुवाधार पाऊस पडूनही पावसाळा संपताच थेंब थेंब पाण्यासाठी पानवडी आसुसलेली असायची. रुद्रगंगाही दिवाळीच्या आसपास शांत व्हायची... अन्‌ मग हंडाभर पाण्यासाठी बाया-बापड्यांची डोंगरकपारीत भटकंती सुरू व्हायची. वर्षानुवर्षांचं हटकून दिसणारं हे चित्र बदलायचं, असं तनिष्कांनी ठरवलं. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर गाव टंचाईमुक्त अन्‌ शिवार जलयुक्त झालं आहे.. बंधाऱ्यात साठलेल्या पाण्यात मत्स्यपालन करून जलसंपत्तीपासून धनसंपत्ती मिळविण्यासाठी आता तनिष्कांनी पदर खोचून सुरवात केली आहे. गावातील एका बंधाऱ्यात नुकतेच मत्स्यबीज सोडले. 

पुरंदर तालुक्‍यातील सासवडजवळील पानवडीची वस्ती सहाशे-सातशे. उंच डोंगर अन्‌ दऱ्याखोऱ्या, चांगलं पर्जन्यमान. पण हे वरदानच पानवडीला शापासारखं वाटू लागलं. गावातला पाटजाई बंधारा, पाझर तलाव व काही साखळी बंधारे गाळाने भरले. परिणामी, पाणीटंचाई. दोन वर्षांपूर्वी गावातील सुषमा भिसे व नलिनी लोळे या महिलांनी तनिष्का गट स्थापन केला. पहिल्या वर्षी म्हणजे ग्रामस्थ, तरुण व महिलांना एकत्र आणून छोट्या बंधाऱ्यातील गाळ काढला. त्यातून महिनाभराची टंचाई मिटली.

दुसऱ्या वर्षी जानेवारीला महिला ग्रामसभा झाली. गावातल्या मोठ्या बंधाऱ्यातला गाळ काढायचं ठरलं. लोकसहभागातून तेरा लाखांचं काम झालं. "सकाळ'नं रिलीफ फंडातून अडीच लाखांची मदत केली. राज्यात बऱ्याच ठिकाणी दुष्काळसदृश स्थिती असतानाही दोनच पावसांत हा बंधारा भरला. गावाला तीन वर्षे पुरेल एवढा साठा झाला. पाणी वापराची आचारसंहिता तयार केली. परिणामी, जलसाठा नियंत्रित राहिला. म्हणूनच यंदाच्या उन्हाळ्यात निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना, पानवडी जलश्रीमंत होती. गावातील एका वस्तीवर तर ऐन उन्हाळ्यात नळानं पाणी सुरू झालं. गावकऱ्यांनी गुढ्या उभारून त्याचं स्वागत केलं.

शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत गावाचा समावेश होताच. तनिष्का, ग्रामस्थ, प्रशासन, खासगी कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्त्व (सीएसआर) व माध्यमांच्या प्रयत्नांतून जवळपास दोन कोटी रुपये खर्चून पानवडीत नवे चौदा बंधारे बांधले गेले. गावकऱ्यांच्या या जिद्दीला वरुणराजानेही कृपा केली. रुसलेली रुद्रगंगा खळाळून वाहिली. गावशिवारात जवळपास कोटी लिटरचा साठा झाला. पाणी आहे पण त्यासाठी तेवढी शेती नाही, अशी पानवडीत स्थिती झाली. 

जादा झालेल्या जलसंपत्तीचा योग्य वापर करून अर्थार्जन करावे, या हेतूनं तनिष्कांनी एका बंधाऱ्यात नुकतेच मत्स्यपालन सुरू केले. मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त वाय. के. बनसोडे, पुणे विभागाचे सहआयुक्त विनय शिकरे, सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी जनक भोसले, बी. एस. पाटील आदी अधिकाऱ्यांनी पानवडीची पाहणी करून मत्स्यबीज उपलब्ध करून दिले. मत्स्यपालनाचे प्रशिक्षण दिले. जोपासना, संरक्षण व मत्स्यविक्री यासंबंधी माहिती दिली. गावातील बावीस बंधाऱ्यांमध्ये टप्प्याटप्प्याने मत्स्यपालन होईल. जलसंधारणातून पिण्याचे, वापराचे, जनावरांना लागणारे व शेतीसाठीचे पाणी तर मिळालेच आहे. पण शिल्लक पाण्यातून अर्थप्राप्ती होईल. जलसंपदेकडून धनसंपदेकडचा प्रवास म्हणूनच पानवडीच्या विकासाचा मार्ग ठरणार आहे. असे अनेक वेगळे उपक्रम तिथे आकाराला येत आहेत. 

Web Title: Water Conservation success story of Panavdi, reports D R Kulkarni