

आळंदी, ता. २१: सोसायटीमध्ये सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या काळात नळाला पाइप लावून दसरा सणानिमित्त वाहने न धुण्याच्या सूचना देऊनही कूपनलिकेच्या (बोअरवेल) नळाला पाइप लावून वाहने धुण्यास विरोध केल्याच्या कारणावरून सोसायटीमधील दोन गटांत वाद झाला. वादाचे पर्यावसन शिवीगाळ करत बकेटने मारहाण करण्यात आल्याची घटना चऱ्होली खुर्द येथील अभिमान श्री सोसायटीमध्ये मंगळवारी (ता. २०) सकाळी साडेदहा वाजता घडली. याप्रकरणी दोन्ही गटांच्या एकूण १० जणांवर परस्परविरोधी फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली.
या प्रकरणी राहुल माधवराव शिंपळे (वय ३३) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सचिन कोठावडे (वय ४६), विवेक कोठावडे (वय १८), कुणाल कोठावडे (वय २०), आशिष भालेराव (वय २८) आणि गणेश धातपांडे (वय २२) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिमान श्री सोसायटीच्या पार्किंगमध्ये आरोपी हे सोसायटीच्या कूपनलिकेचे पाणी नळाला पाइप लावून वाहने धुत होते. त्यावेळी नीलेश चव्हाण या रहिवाशाने ''सोसायटीत पाणीटंचाई असल्याने व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज टाकला आहे, त्यामुळे पाइप न वापरता बादलीत पाणी घेऊन वाहने धुवा'' असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी चिडून जाऊन फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ केली तसेच पाण्याच्या प्लास्टिक बकेटने डोक्यात मारहाण करून जखमी केले.
याच घटनेमध्ये वाहने धुण्यावरून झालेल्या वादानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या कोठावडे या एकाच कुटुंबातील सदस्यांना सोसायटीचे मुख्य गेट बंद करून अडवून मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी सचिन मच्छिंद्र कोठावळे (वय ४६) यांनी आळंदी पोलिस ठाण्यात विरुद्ध बाजूच्या लोकांवर फिर्याद दिली आहे. त्यानुसार नीलेश चव्हाण (वय ३४), राहुल शिंपळे (वय ३३), रवींद्र बदाणे (वय ३१), विवेक पवार (वय ३३) आणि प्रांजय भालेराव (वय ३५) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन कोठावळे हे आपल्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये नळाजवळ बादलीत पाणी घेऊन रिक्षा धुत असताना आरोपींनी त्यांना, त्यांच्या पत्नीला आणि दोन्ही मुलांना बादलीने मारहाण केली. या घटनेनंतर फिर्यादी यांची पत्नी व मुलगा दुचाकीवरून पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना, आरोपींनी सोसायटीचे मुख्य गेट बंद करून त्यांचे वाहन अडवले. तसेच त्यांना शिवीगाळ करत, धमकी देऊन तिथेच अडवून ठेवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.