सिद्धपुरात शेतकऱ्यांनी फिरवला उसावर नांगर

सिद्धपुरात शेतकऱ्यांनी फिरवला उसावर नांगर
Published on: 

MGV26B16831
मंगळवेढा ः पाण्याअभावी उसाचे पीक जळून चालल्याने पिकांतून नांगर फिरवताना शेतकरी.

पाण्याअभावी दोन एकर उसावर फिरवला नांगर!
४० हजारांचा खर्च वाया; उजनीच्या पाणी नियोजनाअभावी शेतकरी हतबल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. २७ : उजनी धरणातून भीमा नदीपात्रात शेतीसाठी पाणी सोडले जात नसल्याने नदीपात्र कोरडे पडले आहे. पिकाला पाणी मिळण्याची आशा मावळल्याने भविष्यात आणखी खर्च करून कर्जबाजारी होण्यापेक्षा सिद्धापूर येथील शेतकरी भीमगोंडा सोनगे यांनी दोन एकर उसाच्या पिकावर नांगर फिरवून ते जमीनदोस्त केले. उसाच्या लागवडीपासून आतापर्यंत केलेला सुमारे ४० हजार रुपयांचा खर्चही वाया गेला आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरूनही शेतीसाठी पाण्याचे नियोजन होत नसल्याने शेतकऱ्यांवर पीक मोडण्याची वेळ आली आहे.

उजनी धरण यंदा शंभर टक्के भरल्याने भीमा नदीला पाण्याच्या पाळ्या नियमित मिळतील, या आशेने सोनगे यांनी ५ सप्टेंबरला चार एकरांत उसाची लागवड केली. उसाचे बियाणे, एकदा खुरपणी आणि खताचा एक डोस यासाठी त्यांनी सुमारे ४० हजार रुपये खर्च केले. मात्र, शेतीसाठी नदीत पाणी सोडण्यापूर्वीच वीजकपातीचे आदेश निघाल्याने पिकाला पाणी मिळण्याची आशा मावळली. पुढील खर्च करून नुकसान वाढविण्यापेक्षा दोन एकरांतील ऊस नांगरून रोटाव्हेटर फिरविण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
दोन वर्षांपासून उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरत असतानाही मंगळवेढा तालुक्यातील शेतीला गरजेच्या वेळी पुरेसे पाणी मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. पिकाला पाण्याची गरज असताना नदीपात्र कोरडे असते, तर नदीत पाणी असताना वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांची अवस्था ‘आई जेवू देईना अन् बाप भीक मागू देईना’ अशी झाली आहे. भविष्यात उजनीतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवल्यास शेतीसाठी पाणी मिळणे आणखी कठीण होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
भीमा नदीवरील बंधाऱ्यांची दारे साधारणतः जूनमध्ये काढली जातात आणि १० ऑक्टोबरनंतर पुन्हा बसवली जातात. या काळात मोठ्या प्रमाणात पाणी कर्नाटक राज्याकडे वाहून जाते. यंदा दुष्काळी परिस्थिती असतानाही नदीपात्रातून वाहून गेलेल्या पाण्याचे नियोजन करून नदीकाठच्या वाढलेल्या बागायती क्षेत्राला दिलासा देण्यात जलसंपदा विभागाला अपयश आल्याची भावना शेतकऱ्यांत आहे.
------------
बंधाऱ्यांची उंची वाढविण्याची मागणी
भीमा नदीकाठच्या शेतीला शाश्वत पाणी उपलब्ध होण्यासाठी बंधाऱ्यांची उंची वाढविण्याचे नियोजन करावे, अशी मागणी पुढे येत आहे. पाण्याअभावी उभे पीक मोडण्याची वेळ आल्याने या परिसरातील अन्य शेतकरीही असाच निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कोट
- उजनी धरण शंभर टक्के भरून जास्तीचे पाणी नदीत वाहून गेल्याने नदीला पाण्याच्या पाळ्या व्यवस्थित मिळतील, या आशेने ५ सप्टेंबरला चार एकरांत उसाची लागवड केली. बियाणे, खुरपणी आणि खतासाठी ४० हजार रुपये खर्च केले. मात्र, नदीत पाणी सोडण्यापूर्वीच वीजकपातीचे आदेश निघाले. त्यामुळे आणखी खर्च करण्यापेक्षा दोन एकरांतील ऊस नांगरून रोटाव्हेटर फिरवले.
- भीमगोंडा सोनगे, शेतकरी, सिद्धापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com