पावसाने दडी मारल्याने जीव टांगणीला

पावसाने दडी मारल्याने जीव टांगणीला
Published on

गुनाट, ता. ६ : एकीकडे पावसाने दीड महिन्यांपासून दडी मारल्यामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई, तर दुसरीकडे चासकमान धरणाचे पाणी अद्यापही गुनाट, निमोणे, निर्वी आदी टेलच्या गावांत आले नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पाणी मिळण्यास उशीर होत असल्याने चासकमानचे पाणी टेलला येणार की पुन्हा मागील आवर्तनाप्रमाणे फक्त हजेरी लावणार हाच संभ्रम शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

पावसाने हात आखडता घेतल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने २० जुलै रोजी चासकमानचे आवर्तन हेड टु टेल सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र तब्बल ४७ दिवस उलटल्यानंतरही हे पाणी टेलच्या गुनाट परिसरातील गावांत पोचले नाही.

शेतकऱ्यांचे पीक नियोजन कोलमडले
सध्या निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे या भागातील शेतकऱ्यांचे ऊस आणि बाजरीचे पीक धोक्यात आले आहे तर रब्बी हंगामातील कांदा पिकाच्या तयारीसाठी चासकमानचे पाणी आल्यानंतरच नियोजन करावे लागणार आहे. मात्र पाणीच आले नसल्याने शेतकऱ्यांचे पीक नियोजन कोलमडले आहे. त्याचा परिणाम रब्बी हंगामावर होणार आहे.

पाणीवाटपात भेदभाव कशासाठी?
चासकमानचे आवर्तन हे शेतकऱ्यांना नक्कीच नवसंजीवनी देणार आहे. मात्र काही गावांना चार दिवस तर ठराविक गावांना गरजेपेक्षा अधिक दिवस पाणी वाटप करण्यात येत आहे. परिणामी शेवटच्या टप्प्यात टेलच्या गावातील आवर्तन उरकते घेण्यात येते. पाणीवाटपात गावागावांत होणारा हा भेदभाव कशासाठी? चासकमान प्रशासनाने राजकीय नेत्यांना खूश करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा, गुनाट येथील शेतकरी नानासाहेब भगत यांनी सांगितले.

सध्या चासकमानचे पाणी वाटप नियोजनानुसार व्यवस्थितपणे सुरू आहे. शेतकऱ्यांच्या व गावांच्या मागणीनुसार पाणी वाटप करण्यात येत आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत.
- धनंजय गावकर, शाखा उपअभियंता, चासकमान प्रशासन
00397

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com