‘भामा आसखेड’मधून आवश्यकतेनुसार पाणी

‘भामा आसखेड’मधून आवश्यकतेनुसार पाणी
Published on: 

राजगुरुनगर, ता. २४ : खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातील पाणीसाठ्यातून पिण्याच्या पाणी योजनांसाठी, जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तसेच उभ्या पिकांसाठी आवश्यकतेनुसार पाणी सोडण्यास जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यासाठी पाणी सोडण्यात येईल, असे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले.‌
यासंदर्भात आमदार काळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, भामा आसखेड धरण प्रकल्पातून खेड, हवेली आणि दौंड तालुक्यांतील ४२ गावांमधील सुमारे २३ हजार ११० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ अपेक्षित होता. मात्र, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी आरक्षित केल्याने २८ ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार धरणाची कालवा प्रणाली रद्द केली. मात्र, दोन्ही महापालिकांच्या पाणीपुरवठा योजना अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने रब्बी व उन्हाळी हंगामात धरणातील पाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये सोडले जाते. या पाण्याचा उपयोग परिसरातील शेतीसाठी होतो. या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याच्या योजना, पशुधन आणि उभ्या चारा पिकांसमोर पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर धरणातील पाण्याचे नियोजन करून आवश्यकतेनुसार भामा आसखेड व चासकमान धरणांतून पाणी सोडावे, अशी मागणी जलसंपदा विभागाकडे केली होती. चासकमान धरणाच्या आवर्तनाबाबत २९ ऑक्टोबर रोजी कालवा समितीच्या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे.

चासकमान धरणाची सर्व आवर्तने सोडली जावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या शेतांत उभ्या असलेल्या पिकांना पाणी देण्याचे नियोजन असेल. मात्र त्यानंतर आवर्तने सोडली तरी मर्यादित स्वरूपात पाणी लोकांना उचलता येईल. वीज पुरवठा नियंत्रित करून पिण्याच्या पाणी योजना, जनावरे आणि चारा पिकांसाठी पाणी वापरावे, यासाठी प्रशासन नियोजन करेल. त्यामुळे कांदा, ऊस, तरकारी यांसारखी पिके लोकांनी आपली पाण्याची सोय पाहून जबाबदारीने घ्यावीत. खेड तालुक्याचा ३८ कोटींचा टंचाई आराखडा सादर केला असून त्याला मंजुरी मिळेल. त्यातून पाणीपुरवठा योजना दुरुस्ती, विंधन विहिरी, टँकरने पाणीपुरवठा, नळ पाणी पुरवठा योजनांची प्रलंबित कामे इत्यादी कामे केली जातील.
- बाबाजी काळे, आमदार, खेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com