

पान ५
मराठवाड्यात सहा दिवसांत
७० वर टॅंकर वाढले
तहानलेल्या गावे, वाड्यांना १८१ टॅंकरने पाणीपुरवठा, ४४७ विहिरींचे अधिग्रहण
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर ः मराठवाड्यात पुन्हा पावसाचा मोठा खंड पडल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांवर टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. साधारण दीड महिन्यापूर्वी काही भागांत चांगला, तर बहुतांश ठिकाणी भुरभुर का होईना पाऊस झाला होता. त्यामुळे पाण्याची चिंता काहीअंशी कमी झाली होती. मात्र पुन्हा पावसाने दडी मारल्याने पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. १९ ऑगस्ट रोजी ११४ असलेली टॅंकरची संख्या अवघ्या सहा दिवसांत वाढून १८१ वर पोहोचली आहे.
याशिवाय मराठवाड्यात ४४७ विहिरीही अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्तालय प्रशासनातर्फे देण्यात आली.
यंदा मराठवाड्यात मॉन्सून वेळेत दाखल झालाच नाही. त्यामुळे जून आणि जुलैअखेरपर्यंत चारशेवर टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. जुलै महिन्यातील शेवटचे चार-पाच दिवस वगळले तर संपूर्ण महिना आणि ऑगस्ट महिन्यातील पंधरवाड्यातील काही दिवस, अशा एकूण २५ ते २८ दिवसांचा पावसाचा खंड पडल्याने आता पुन्हा ग्रामीण भागात टंचाईच्या झळा तीव्र होत असल्याचे चित्र आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरसह विभागातील चार जिल्ह्यांत ९२ गावे, ३६ वाड्यांना १५६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. जून-जुलै महिन्यांत वाढ झाल्याने एकही जिल्हा टॅंकरमुक्त न झाल्याने विभागातील २४४ गावांसह ९६ वाड्यांना २१ शासकीय, ३९२ खासगी, अशा एकूण ४१३ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. विशेष म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही टॅंकर संख्या कमी होऊन चक्क ९६ वर आली होती. यात १९ ऑगस्टदरम्यान पुन्हा वाढ होऊन ती ११४ वर गेली. त्यानंतरच्या पुढील सहाच दिवसांत या संख्येत पुन्हा वाढ झाली असून, ही टॅंकरसंख्या आता १८१ वर पोहोचली आहे.
...असे आहेत टॅंकर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६२ गावे, १७ वाड्यांना ९० टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जालन्यातील १६ गावे, १३ वाड्यांना २८ टॅंकरने, बीडमधील २० गावे, २५ वाड्यांना तब्बल ५४ टॅंकरने, तर धाराशिव जिल्ह्यातील ७ गावांना ९ टॅंकर, अशी एकूण १०५ गावे, ५५ वाड्यांना मिळून १८१ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मराठवाड्यात ४७७ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले.
मराठवाड्यात केवळ ५० टक्के पाणीसाठा
एकीकडे पावसाचे अल्प प्रमाण, तर दुसरीकडे बाष्पीभवनामुळे मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांतील साठा कमी होऊ लागला आहे. मराठवाड्यातील लघू, मध्यम आणि मोठ्या एकूण ९२९ प्रकल्पांत २५ ऑगस्टअखेर ३६५८.९९ दलघमी म्हणजेच केवळ ५०.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षी हीच टक्केवारी ७३.०२ टक्के इतकी होती, अशी माहिती जलसंपदा विभागातर्फे देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.