

नागरिकांची पाण्यासाठी भटकंती
टँकरची चाके थांबली; जुन्या ठेकेदाराची मुदत संपली
सनी सोनावळे : सकाळ वृत्तसेवा
टाकळी ढोकेश्वर, ता. १३ : पारनेर तालुक्यात वाढत्या उन्हाच्या झळांमुळे पाणीटंचाई गंभीर बनली असतानाच टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून ठप्प झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. जुन्या ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर नव्या ठेकेदाराकडून व्यवस्था उभारण्यात विलंब होत असल्याने ३१ गावे व २२३ वाड्यांतील ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना दररोज ११ लाख २० हजार ६२० लिटर पाणी टँकरद्वारे पुरवले जात होते. ही वाहतूक अहिल्यानगर येथील गाडे ट्रान्स्पोर्टकडून केली जात होती. मात्र, संबंधित ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर नव्या निविदेनुसार सोलापूर जिल्ह्यातील बबनराव शिंदे मोटार वाहतूक संस्था, म्हाडा यांच्याकडे काम देण्यात आले, तरीही अद्याप पूर्ण व्यवस्था कार्यान्वित न झाल्याने पाणीपुरवठा सुरू होऊ शकलेला नाही.
तालुक्यातील अनेक विहिरी व बोअरवेल कोरड्या पडल्या असून, भूजल पातळी निचांकीवर गेली आहे. त्यामुळे नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. गावोगाव सरपंच व नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. तातडीने टँकर सुरू न झाल्यास पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
---------
ऐन टंचाईच्या काळात पाणी वाहतूक टँकर बंद होणे गंभीर बाब आहे. नवीन ठेकेदाराकडून विलंब होत असल्यास जुन्या ठेकेदारास मुदतवाढ द्यावी. मात्र, नागरिकांचा पाणीपुरवठा खंडित होऊ देऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मी दिल्या आहेत.
-काशिनाथ दाते, आमदार.
----------
नवीन ठेकेदाराकडून टँकरना जीपीएस बसविणे, डिझेलसह आवश्यक व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे. प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, त्वरित सर्व टँकर सुरू करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल.
-दिलीप सोनकुसळे, गटविकास अधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.