pune.jpg
pune.jpg

Loksabha 2019 : भ्रष्ट कारभारामुळे पुण्यात पाण्याचे संकट गंभीर : रमेश बागवे

पुणे : मागील वर्षीच्या दिवाळीपासूनच पुणे शहरातील नागरिकांना अभूतपूर्व पाणी टंचाईच्या संकटाला दररोज तोंड द्यावे लागत असून, अक्षरशः नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या परिस्थितीमध्ये मे-जून पर्यंत शहरातील पाणी पुरवठ्याचे संकट किती मोठ्या प्रमाणात गहिरे होईल, याची कल्पना करणे देखील तितकेच भयकारक वाटत आहे, असे प्रतिपादन पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी आज ‘सकाळ’शी बोलताना केले.
 

पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे अतोनात हाल सोसणाऱ्या पुणेकरांना, मागील तीन वर्षांपासून सातत्याने वाढणाऱ्या पाणीपट्टीमुळे, ‘दुष्काळात तेरावा महिना’ सहन करावा लागत असल्याचीही खरमरीत टीका बागवे यांनी यावेळी बोलताना केली.
''वाईटात वाईट बाब म्हणजे, २६ सप्टेंबर २०१८ ला, खडकवासला धरणातून येणारा मुठा नदीचा उजवा कालवा जनता वसाहतीजवळ फुटल्याने लाखो दशलक्ष लिटर पाणी वाया गेले आणि शिवाय, झोपडपट्टीतील जवळपास हजार कुटुंबे उध्वस्त झाली. हा सारा प्रकार प्रशासन आणि त्यांच्यावर अजिबात अंकुश नसलेले महानगरपालिकेतील सत्ताधारी यांच्या निष्काळजीपणा आणि शहरविकासाबाबतची बेफिकिरीमुळेच घडल्याची पुणेकरांची भावना झाली आहे.;'',असेही बागवे यांनी स्पष्ट केले. 

पुणेकरांनी मोठ्या आशेने शहराला भारतीय जनता पक्षाला भरघोस निवडून दिले. आठ आमदार, सत्त्याण्णव नगरसेवक, एक पालकमंत्र्यांसह तीन मंत्री आणि दोन खासदार; तसेच राज्यातही यांचेच सरकार असूनही, शहराच्या नशिबी अकार्यक्षम व भ्रष्ट कारभार आल्याची टीका बागवे यांनी केली. अशातच २०१६ ते २०१८ या वर्षात पाणीपट्टीचा दर हा सरासरी १२% ते १५% पर्यंत वाढवण्यावर सत्ताधाऱ्यांनी भर दिल्याचे निदर्शनास आणून, पुण्यात २३ रोजी होणाऱ्या मतदानाच्या दुसऱ्या दिवसापासूनच एकदिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार असल्याचा आरोप करून, बागवे यांनी थेट पुण्याचे पालकमंत्री व भाजपचे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांना व तिकीट नाकारलेले भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांना लक्ष केले.

आजवर पुणे शहराचा पाण्याबाबत देशातील अतिशय सुदैवी आणि सुनियोजित शहर म्हणून गणले जात असल्याचे सांगून, बागवे यांनी मागील तीन ते चार वर्षांपासून शहराच्या या नावलैकिकाला हरताळ फासला गेल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांनी शहर व ग्रामीणभागासाठीच्या पाणी पुरवठ्याबाबत भाजप सरकारने दिलेले एकही आश्वासन पाळले नसून, आघाडी सरकारच्या काळात कमी पाऊस पडूनही, आम्ही मोहन जोशी यांच्या पुढाकाराने सुयोग्य नियोजन केल्यामुळेच, पुणेकरांचा पिण्याच्या पाणी पुरवठा सुरळीत ठेवला होता आणि पुणेकरांना टंचाईची झळ लागू दिली नव्हती, याचेही बागवे यांनी स्मरण करून दिले.

तरी, या प्रश्नी सर्व विरोधी पक्षांनी आणि सजग नागरिकांनी एकत्र येऊन, पाण्याच्या पुरवठा सुरळीत ठेवावा आणि पाणीपट्टीत कोणतीही वाढ करू नये, यादृष्टीने लढा दिला पाहिजे आणि २३ ला पुण्यात होणाऱ्या मतदानातून आपला विरोध निर्णायकपणे नोंदवून, अशा अकार्यक्षम व भ्रष्ट सत्ताधाऱ्य़ांना दूर केले पाहिजे, असे आवाहन बागवे यांनी शेवटी केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com